विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : राज्यात उन्हाचा चटका वाढतोय, त्यामुळे पाण्याची मागणी देखील वाढू लागली आहे. त्यातच पाण्याची पाणीपातळी घसरत आहे. बोअरवेल आणि विहिरीतील पाणी देखील कमी होत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या डोनगाव तांबे येथे पाणी टंचाई जाणवू लागली आहे. मराठवाडा हा सतत दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. परंतु याच मराठवाड्याला नाथसागर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यावर मराठवाड्याची तहान भागवली जाते. मात्र 'धरण उशाला आणि कोरड घशाला' अशी म्हणण्याची वेळ याच पैठण तालुक्यातील डोणगाव तांबे नागरिकांवर आल्याची पाहायला मिळत आहे.
पैठण तालुक्यातील डोणगाव तांबे गावात आज भीषण पाणी टंचाईचा सामना या ठिकाणच्या तांड्यावरील व गावातील नागरिकांना करावा लागत आहे. गावात पाणी नसल्यामुळे इतर गावातील नागरिक आपल्या मुलींचे लग्न या गावातील मुलांशी लावत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया जय महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असता तरी देखील पैठण तालुक्यातील डोणगाव तांबे गावात भीषण उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई भेडसावत आहे. अक्षरशः महिलांना एक ते दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा : Sunita Williams: सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार
तर पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकंती करावी लागत आहे. गावामध्ये तब्बल एक ते दीड महिना पाणी सुटत नसल्याने चक्क पाणी आणण्यासाठी शाळकरी मुलांनाही आता डोक्यावर हंडा घेण्याची वेळ आली आहे. आम्हाला शाळा सोडून पाणी आणण्यासाठी घरी राहावे लागते. याचाच फटका आमच्या अभ्यासक्रमावर होत आहे. यंदाच्या पावसाळ्यात डोणगाव तांबे येथील पाझर तलाव भरला होता. परंतु मार्च महिन्यात तलाव कोरडा पडला असून पाणीपातळी खोल गेल्याने विहिरीसह कूपनलिका कोरड्या होऊन पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गावामधील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा फटका असून आता लग्नसराईवरही याचा परिणाम पाहायला मिळत आहे. डोणगाव तांबे येथे लग्नसोहळ्यालाही विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.डोणगाव तांबे हे गाव तीन हजार लोकसंख्येचे असून येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आजूबाजूच्या शेतातून पाणी आणावे लागते. डोणगाव ग्रामपंचायतीच्या विहिरीला पाणी नसल्याने नळाद्वारे पाणीपुरवठा होत नाही. गावालगत काही विहिरींना पाणी आहे. मात्र ज्यांची आहे, त्यांनाही टंचाई भासेल, यामुळे ते भरू देत नाहीत. पन्नास रुपये खर्च करून दोनशे लिटर पाणी येथील ग्रामस्थांना विकत घ्यावे लागत आहे. महिलांना एक ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. आमच्याकडे कुठलेच वाहन नाही. कामाला गेली तरच पोटाला खायला मिळेल, अशी परिस्थिती आहे. डोणगावच्या महिलांना पाण्याच्या शोधासाठी दाहीदिशा भटकावे लागत आहे. सध्या मार्च महिना सुरू असून अजून मे महिना जायचा असल्याने यापेक्षाही गंभीर परिस्थिती होण्याची वाट न पाहता, प्रशासनाने डोणगावकरांची पाण्याची समस्या तातडीने सोडवावी, अशी आर्त मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
हेही वाचा : आव्हाड राणेंच्या कानात काय म्हणाले ? राजकीय वर्तुळात चर्चा
पाण्यावरून नागरिकांचे प्रशासनाला प्रश्न
सध्या पाण्यासाठी रोजंदारी बुडवावी लागत आहे. पाणी भरताना विहिरीत पडण्याची भीती असते. कोणाचा तरी जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्नही या ठिकाणच्या उपस्थित केला येत्या 31 मार्चपर्यंत प्रशासनाने आमच्या गावात टँकर द्यावा अन्यथा आम्ही थेट पैठणच्या पंचायत समिती समोर जाऊन थंड आंदोलन करू असा इशारा या ठिकाणच्या तरुणांने दिला आहे. पाण्यासाठी रोजंदारी बुडवावी लागते. गावातील अनेक नागरिकांकडे कुठलेच वाहन नाही. घरात एकटी असल्याने कामाला गेली तरच पोटाला खायला मिळेल, अशी परिस्थिती आहे. सध्या पाण्यासाठी रोजंदारी बुडवावी लागत आहे. एकदा तर विहिरीत पडता पडता मी वाचली होती. कोणाचा तरी जीव गेल्यावर मगच प्रशासनाला जाग येईल का? असा प्रश्न अनेक महिलांनी केला आहे.
'दिवसभर पाण्याचाच विचार असतो'
आम्हा महिलांना पाण्यासाठी शेत शिवारात पायपीट करीत जावे लागते. घरात पाणी नसल्याने कोणत्याच कामात चित्त लागत नाही. दिवसभर पाण्याचाच विचार असतो. पाण्यासाठी महिलांचेच जास्त हाल होत असतात. एवढी गंभीर समस्या निर्माण झालेली असताना आमची पाण्याची समस्या कोणीच सोडवत नाही.
'पन्नास रुपये टाकी पाणी विकत घेतो'
पाण्यासाठी दररोज पहाटे चारला उठावे लागते. दूरवर जाऊन पाणी आणावे लागते. त्यामुळे गावात कोणी पिण्यासाठी पाणी मागितले तरी देण्याची हिंमत होत नाही. आम्हाला वापरण्यासाठी देखील पाणी नसल्याने अक्षरशः पन्नास रुपये टाकीप्रमाणे पाणी विकत घ्यावे लागत आहे.