पालघर: वसई-विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मंगळवारी सकाळी धाड टाकली. ही कारवाई मुंबई व परिसरातील सुमारे 12 ठिकाणी एकाच वेळी करण्यात आली. बेकायदेशीर बांधकाम घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ED ने ही छापेमारी केली. हे संपूर्ण प्रकरण 2009 पासून सुरू असलेल्या बेकायदेशीर निवासी आणि व्यावसायिक इमारतींच्या बांधकामाशी संबंधित आहे. या इमारती सरकारी व खाजगी जमिनीवर, विशेषतः सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि डंपिंग ग्राउंडसाठी राखीव भूखंडांवर उभारण्यात आल्या होत्या.
हेही वाचा - Mumbai Water Cut: मुंबईकरांनो लक्ष द्या! 31 जुलैला बांद्रा-खार भागात 14 तास पाणी पुरवठा बंद
ED च्या तपासानुसार, बिल्डर्स आणि व्हीव्हीएमसीच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने बनावट परवाने आणि मान्यता दाखवून 41 अनधिकृत इमारती बांधल्या. यातील फ्लॅट सामान्य नागरिकांना विकून त्यांची फसवणूक करण्यात आली. या छाप्यांत नगररचना उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांच्या घरी 8.6 कोटी रुपये रोख, 23.25 कोटी रुपये किमतीचे सोने-हिऱ्यांचे दागिने, तसेच अनेक महत्त्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत.
हेही वाचा - इथून पुढे एकही चूक... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना खडसावलं
दरम्यान, ईडीच्या तपासात असे दिसून आले की 2009 पासून या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम सुरू आहे. तपासादरम्यान असे आढळून आले की या बेकायदेशीर इमारती विविध व्हीव्हीएमसी अधिकाऱ्यांच्या जवळच्या संगनमताने बांधल्या गेल्या होत्या. या घोटाळ्यात बिल्डर्स सीताराम गुप्ता, अरुण गुप्ता, वसई-विरार महानगरपालिकेतील काही माजी व सध्याचे अधिकारी सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे.