Wednesday, August 20, 2025 10:38:28 AM

मीरा रोडमध्ये कबुतरांना खायला देण्यास आक्षेप घेतल्याने वडील-मुलाला मारहाण; 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

69 वर्षीय रहिवासी महेंद्र पटेल आणि त्यांचा मुलगा प्रेमल पटेल यांनी त्यांच्या परिसरातील महिला रहिवासी आशा व्यास यांना कबुतरांना खायला देऊ नका, असे सांगितले. या सूचनेवरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.

मीरा रोडमध्ये कबुतरांना खायला देण्यास आक्षेप घेतल्याने वडील-मुलाला मारहाण 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई: रविवारी सकाळी मीरा रोड येथे एक धक्कादायक घटना घडली. येथे कबुतरांना खायला देण्यास आक्षेप घेतल्याने वडील आणि मुलावर हल्ला करण्यात आला. ही घटना मीरा रोड येथील डीबी ओझोन इमारतीजवळील ठाकूर मॉल परिसरात घडली. 69 वर्षीय रहिवासी महेंद्र पटेल आणि त्यांचा मुलगा प्रेमल पटेल यांनी त्यांच्या परिसरातील महिला रहिवासी आशा व्यास यांना कबुतरांना खायला देऊ नका, असे सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला देण्यास बंदी आहे. या सूचनेवरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.

दरम्यान, व्यास यांच्या इमारतीतील दुसरे रहिवासी सोमेश अग्निहोत्री आणि आणखी दोन व्यक्ती तेथे आले. यावेळी संतापलेल्या अग्निहोत्री यांनी प्रेमल पटेल यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. तसेच दुसऱ्या व्यक्तीने त्यांच्या मानेचा चावा घेतला. या हल्ल्यात वडील-मुलगा दोघेही जखमी झाले. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, काशिमीरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित आंधळे यांनी घटनेची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं की, जखम गंभीर नसल्याने कोणालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. मात्र, सोमेश अग्निहोत्री, आशा व्यास आणि इतर दोघांविरुद्ध विविध भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा - न्यायालयाच्या आदेशानंतर BMC कडून कबूतरांना खायला देणाऱ्या 100 हून अधिक जणांना दंड

मुंबईत कबुतरखान्यांवर बंदी - 

मुंबईतील कबुतरखान्यांवर बीएमसीकडून सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला देण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला होता. बीएमसीनेही शहरातील विविध कबुतरखाने बंद करत आरोग्यधोका आणि सार्वजनिक त्रासाचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र, या बंदीला काही धार्मिक संघटना आणि जैन समुदायाचा विरोध आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कबुतरांना खायला घालणे ही धार्मिक श्रद्धेचा भाग आहे आणि बंदीमुळे त्यांच्या श्रद्धेचा अपमान होतो. त्यामुळे त्यांनी ही बंदी रद्द करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा -  Navi Mumbai : उंदराने खाल्लेले आईसक्रीम ग्राहकांना; सीवूड्स मॉलमध्ये अजब प्रकार

कबुतरांना खायला देण्याच्या मुद्द्यावरून आता सामाजिक संघर्ष निर्माण झाला आहे. एका बाजूला न्यायालयीन आदेश आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे, तर दुसऱ्या बाजूला धार्मिक भावना आणि पशुप्रेमींचा विरोध. आता या दोन्ही परिस्थितीमुळे भविष्यात देखील अशा प्रकारचे वाद उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  
 


सम्बन्धित सामग्री