Wednesday, August 20, 2025 09:20:28 AM

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी; महिना ₹61,000 पगाराची मुख्यमंत्री फेलोशिप जाहीर

राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला 'मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम' पुन्हा एकदा नवीन उमेदवारांसाठी खुला होत आहे.

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी महिना ₹61000 पगाराची मुख्यमंत्री फेलोशिप जाहीर

मुंबई: राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा. त्यासोबत त्यांच्या ज्ञानामध्ये, अनुभवामध्ये भर व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला 'मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम' पुन्हा एकदा नवीन उमेदवारांसाठी खुला होत आहे. या उपक्रमामध्ये राज्यभरातील केवळ 60 हुशार, अभ्यासू व तंत्रस्नेही तरुणांची निवड केली जाणार असून, त्यांना एक वर्षासाठी जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत थेट काम करण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना शासनाच्या कामकाजाची प्रत्यक्ष अनुभूती मिळेल, आणि त्यांच्या कल्पकतेचा, नवदृष्टीकोनाचा आणि तंत्रज्ञानातील प्रभुत्वाचा उपयोग प्रशासन सुधारण्यात होईल. हा उपक्रम नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत राबविण्यात येणार आहे.


फेलोशिपचे वैशिष्ट्ये:

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची कालावधी 12 महिन्यांसाठी मर्यादित आहे. वयाची मर्यादा 21 ते 26 वर्षे आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून 61,500 रुपये प्रति महिना मिळणार आहेत.


मुख्यमंत्री फेलोशिपची पात्रता:

नागरिकत्व: अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.

शैक्षणिक अट: अर्जदार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. पदवीधरचे गुण किमान 60% असणे अपेक्षित आहे.

अनुभव: व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप किंवा आर्टिकलशिपसोबत किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल.

भाषा आणि संगणक ज्ञानाच्या अटी: मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यासोबतच, संगणक हाताळणीमध्ये प्राविण्य आणि इंटरनेटचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 21 ते 26 असणे अपेक्षित आहे.


अर्ज करण्यासाठी किती शुल्क असतील?

अर्ज करण्यासाठी उमेदवाराला 500 रुपये शुल्क लागेल. या कार्यक्रमात फेलोंची संख्या 60 इतकी निश्चित करण्यात आली आहे. त्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या 1/3 राहील. 1/3 महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल. फेलोंचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल.

निवड प्रक्रिया: फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच, ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा (Objective Test) द्यावी लागेल.

ऑनलाईन परीक्षा देण्याची कार्यपद्धती संचालनालयाच्या mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. त्यासोबत, त्यातील अटी आणि शर्तींचे उमेदवाराने पालन करणे आवश्यक राहील. यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात काम केलेले फेलो पुन्हा या कार्यक्रमांतर्गत फेलो निवडीसाठी पात्र असणार नाहीत. तसे फेलोंनी अर्जात नमूद करणे आवश्यक राहील.


सम्बन्धित सामग्री