Maharashtra Congress New Chief: 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा देणारे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांच्या जागी काँग्रेसने गुरुवारी बुलढाणा जिल्ह्यातील माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी तात्काळ नियुक्ती केली.
कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ?
हर्षवर्धन सपकाळ यांनी 2014 ते 2019 पर्यंत महाराष्ट्रातील बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जवळचे नेते म्हणून ओळखले जातात.
हेही वाचा - आदित्य ठाकरेंनी दिल्लीत पवारांना भेटणं टाळलं; पवारांवर ठाकरे गटाची नाराजी
विजय वडेट्टीवार यांच्यावर मोठी जबाबदारी -
दरम्यान, काँग्रेसने महाराष्ट्रातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून विजय वडेट्टीवार यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून विजय नामदेवराव वडेट्टीवार यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
हेही वाचा - परवानगी घेतल्याशिवाय स्नेहभोजनाला जाऊ नका; आदित्य ठाकरेंच्या पक्षातील खासदारांना सूचना
दरम्यान, नुकत्याच विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासूनच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कोण होईल? याची चर्चा सुरू होती. महाराष्ट्रातील अनेक काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे नावे चर्चेत असताना आज अचानक माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले.
विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी व नाना पटोले यांचा एक छत्री कारभार यामुळे काँग्रेसमध्ये फूट पडली होती. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची नाना पटोले यांच्या बाबतीत तक्रार दिल्लीतील काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांच्याकडे केली होती. निवडणुकीतील प्रचारादरम्यान काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी नाना पटोले यांना विश्वास देत त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या. परंतु महाराष्ट्रात काँग्रेसला आपले अस्तित्व फारसे टिकवता आले नाही. तसेच स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फक्त 529 मतांनी त्यांची जागा जिंकता आली.