गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगजेबाच्या कबरीवरून राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असून, याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिकच पेटले आहे. 'औरंगजेब क्रूर होता, तसेच देवेंद्र फडणवीसही क्रूर आहेत' असे वक्तव्य करून सपकाळांनी राजकीय वादाला तोंड फोडले. यानंतर भाजपकडून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
याच वादात उडी घेत माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी हर्षवर्धन सपकाळांवर जोरदार टीका केली आहे. 'हर्षवर्धन सपकाळ हा मूर्ख माणूस आहे,' असे स्पष्ट शब्दांत म्हणत त्यांनी सपकाळांच्या विधानाचा समाचार घेतला. 'औरंगजेब कोण होता, महाराष्ट्रातील लोक त्याच्याबद्दल काय विचार करतात हे सर्वांना माहीत आहे. अशा क्रूर शासकाची तुलना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी करणे म्हणजेच मूर्खपणा आहे,' असे राणे म्हणाले.
‘पक्ष वाढवण्याऐवजी बुडवण्याचं काम'
नारायण राणे यांनी यावेळी सपकाळांवर आणखी टीका करताना त्यांची काँग्रेसमधील भूमिका आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'हर्षवर्धन सपकाळ यांची नेमणूक पक्ष वाढवण्यासाठी झाली नसून, काँग्रेस बुडवण्यासाठीच झाली आहे,' असा गंभीर आरोप राणेंनी केला. तसेच, 'त्यांना राज्यातील प्रश्नांची जाण नाही आणि अध्यक्षपदाचा कशासाठी उपयोग करायचा हेच त्यांना ठाऊक नाही,' असेही ते म्हणाले.
Vidhan Parishad Election 2025: विधानपरिषदेवर शिवसेनेचा विश्वासू चेहरा;चंद्रकांत रघुवंशींची निवड निश्चित!
राणेंनी यावेळी हर्षवर्धन सपकाळांच्या राजकीय कारकीर्दीवरही सवाल उपस्थित केला. 'हर्षवर्धन सपकाळांचा संपूर्ण राजकीय इतिहास बाहेर काढा. महाराष्ट्राच्या विकासात त्यांनी नेमके काय योगदान दिले ते आधी स्पष्ट करा, मग त्यांच्याबद्दल चर्चा करा,' असा उपरोधिक टोला राणेंनी लगावला.
स्वतःच्या काँग्रेसमधील प्रवासावर भाष्य करताना राणे म्हणाले, 'मी काँग्रेसमध्ये कोणत्या महत्वाकांक्षेसह गेलो होतो हे वेगळं आहे. मात्र, आता मी काँग्रेसचा भाग नाही आणि त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ किंवा त्यांच्या विधानांवर बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.' त्यांनी यावेळी जुने वाद उकरून काढण्यास टाळाटाळ केली, मात्र सपकाळांवर हल्लाबोल करायला त्यांनी कमी केले नाही.