छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, उष्णतेचा तडाखा आता जीवघेणा ठरत आहे. सोयगाव तालुक्यातील निमखेडी बस थांब्यावर उष्माघातामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अमोल दामोदर बावस्कर (वय 25) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
39 अंश सेल्सिअस तापमानाचा फटका
सोयगाव तालुक्यात काल 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, उन्हाचा झळा आता जीवघेणा ठरत आहे. निमखेडी बस थांब्यावर उन्हाच्या तडाख्यामुळे अमोल बावस्कर हे थांबले होते. मात्र, तीव्र उष्णतेमुळे त्यांना उष्माघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
हेही वाचा: हत्तींच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, वनविभागाचे दुर्लक्ष
उन्हाचा पारा चढत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. उष्णतेपासून बचावासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि बाहेर काम करणाऱ्या व्यक्तींनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
सोयगाव तालुक्यात उष्माघातामुळे पहिला बळी गेल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. सार्वजनिक ठिकाणी पाणपोई, सावली व्यवस्था आणि आरोग्य केंद्रांत उष्माघातासाठी तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असा आग्रह ग्रामस्थांकडून धरला जात आहे.