Wednesday, August 20, 2025 04:30:21 AM

Chhagan Bhujbal: ओबीसीत शिरकाव करत असेल तर गप्प बसणार नाही....; भुजबळांनी जरांगेंना सुनावलं

उगाचच आम्ही कुणाला टार्गेट का करु अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

chhagan bhujbal ओबीसीत शिरकाव करत असेल तर गप्प बसणार नाही भुजबळांनी जरांगेंना सुनावलं

नाशिक: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन करणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा तरुण मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यावे, आम्ही मुंबईला येत नाही, आरक्षण जाहीर केले तर आम्ही मुंबईला जाणार नाही. उगाचच आम्ही कुणाला टार्गेट का करु अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.  

संविधानाने दिलेले अधिकार आहेत. उपोषण करा, भाषणं करा पण नियमात राहून करा. कोणती कुरघोडी करू नका. मराठा समाजाला आरक्षण देता आले, ते दिले आणखी काय पाहिजे असा सवालही भुजबळांनी जरांगेंना विचारला आहे. तसेच कुणी ओबीसीत शिरकाव करत असेल तर गप्प बसणार नाही असे खडेबोल मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना सुनावले आहेत. 

हेही वाचा: Ajit Pawar: एक मिनिट...ऐकायला शिक म्हणत अजित पवारांनी नेत्याला फटकारलं

'नियमात राहून आंदोलन कर'

मंत्री भुजबळ म्हणाले, "आंदोलन जालन्यात कर, अंतरवाली सराटीत कर, मुंबईत कर नाहीतर दिल्लीत कर, त्याला कोण आडव येत आहे. पण आंदोलन नियमात करा. संविधानांची दिलेले अधिकार आहेत. उपोषण, भाषण कर, पण नियमात कर. मात्र कोणती कुरघोडी करू नये. मराठा समाजाला आरक्षण देता आले ते दिले आणखी काय पाहिजे", असा सवाल यावेळी त्यांनी केला. इतर कोणत्या समाजात गेला तर कोणी सहन करणार नाही. ओबीसी समाजात कोणी शिरकाव करत असेल तर गप्प बसणार नाही असा आक्रमक पवित्रा भुजबळांनी घेतला आहे.

'सुरज चव्हाणांना काही कारणामुळे महत्त्वाच्या पदावरून दूर करणं योग्य नाही'
दरम्यान, नुकतच सुरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी जबाबदारी देण्यात आली. यावर बोलताना, माझ्यासमोर सुरज चव्हाण यांना सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे. त्याने अनेक वर्ष पक्षात काम केले आहे. त्याची चूक झाली त्याने माफी मागितली आहे. काही कारणामुळे त्यांना महत्त्वाच्या पदावरून दूर करणं किंवा त्यांना शिक्षा देणं, कायमस्वरूपी लांब ठेवणे हे योग्य आहे असं मला वाटत नाही असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. 

 


सम्बन्धित सामग्री