Maharashtra Weather Update : IMD चा इशारा!, महाराष्ट्रात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता
Maharashtra Weather Update मुंबई : देशभरात हवामानाचा लहरीपणा वाढत आहे. एकीकडं उष्णतेचा जोर वाढला असताना, दुसरीकडं महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये हवामानात बदल अनुभवायला मिळतील. विदर्भात गारपीट, तर कोकणात दमट उष्णतेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईत ढगाळ वातावरण
राजधानी मुंबई आणि उपनगरांमध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, कमाल तापमान 29.22 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 23.99 अंश सेल्सिअस राहण्याची राहण्याची शक्यता आहे. मुंबईत आर्द्रता 54 टक्के असल्यामुळे उष्णतेचा त्रास जाणवेल.
विदर्भात गारपीट आणि विजांचा कडकडाट
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काही ठिकाणी जोरदार वारे वाहतील आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - महिला सहकाऱ्याच्या केसांवर टिप्पणी करणे किंवा त्याबद्दल गाणे गायणे लैंगिक छळाच्या श्रेणीत येते की, नाही? मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलं? जाणून घ्या
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज
मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा जोर वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांतही अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा - लाडक्या बहिणींना 2100 रूपये मिळण्याबाबत स्पष्टच बोलले उपमुख्यमंत्री शिंदे
कोकणात दमट आणि उष्ण हवामान
कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये उष्णता आणि दमट हवामान जाणवेल. सध्या पावसाची शक्यता नसली तरी वातावरणात आर्द्रता जास्त असल्यामुळे प्रचंड उकाडा या भागात असणार आहे.
उन्हाच्या लाटेचा इशारा
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवस उत्तर-पश्चिम भारतात तापमान ३ ते ५ अंशांनी वाढणार आहे. महाराष्ट्रातही काही भागांत तापमान वाढण्याची शक्यता आहे. राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमानाचा पारा ४० अंशांच्या घरात पोहोचू शकतो.