मुंबई: विधानसभेच्या अधिवेशनात ऑनलाइन रमी खेळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या माणिकराव कोकाटेंना महाराष्ट्र सरकारने क्रीडा मंत्री म्हणून नियुक्त केले. यामुळे आता राज्याचे राजकारण तापले आहे. या निर्णयावर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माणिकराव कोकाटेंकडे क्रीडा व युवक कल्याण विभाग सोपवण्यात आला असून, त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी विभाग देण्यात आला आहे. हा निर्णय सरकारने विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे घेतल्याचे मानले जात आहे. परंतु, आता या प्रकरणातून कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.
हेही वाचा - तुम्ही अजूनही पुण्याचे नाही, कोल्हापूरचेच वाटता, दादांचा दादांना मिश्किल टोला
विरोधकांचा सरकारवर हल्ला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणाऱ्या सभागृहात पत्ते खेळणाऱ्या व्यक्तीकडून राजीनामा घेणे अपेक्षित होते, पण त्याऐवजी त्यांना बढती दिली गेली. एकीकडे 'खेलो इंडिया' सारख्या योजनांद्वारे खेळाडूंना संधी दिली जाते, तर दुसरीकडे 'रमी राव' यांना क्रीडा मंत्रालय देणे हे महाराष्ट्रासाठी अपमानास्पद आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - 'दहशतवाद कधीच भगवा नव्हता...'; मालेगाव स्फोट प्रकरणातील निकालावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
दरम्यान, शिवसेनेना खासदार संजय राऊत यांनीही कोकाटेंच्या नियुक्तीवर टीका केली. त्यांनी म्हटलं की, माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा नैतिक अधिकारच नाही. तथापी, राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. कोकाटे यांच्यावर याआधीही शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे टीका झाली होती. आता, विधानसभेत रमी खेळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, जनतेत संतापाचे वातावरण निर्माण झाले. अशावेळी मंत्रालय फेरबदल करून संताप कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.