Wednesday, August 20, 2025 09:28:19 AM

जय आणि ऋतुजा यांचा साखरपुडा; पवार कुटुंबावर आनंदाचा वर्षाव

जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा गुरुवारी पुण्यामध्ये दिमाखात साखरपुडा पार पडतोय. या साखरपुड्याच्या निमित्ताने पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

जय आणि ऋतुजा यांचा साखरपुडा पवार कुटुंबावर आनंदाचा वर्षाव

पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि साताऱ्यातील फलटण येथील प्रवीण पाटील यांच्या कन्या ऋतुजा पाटील यांचा गुरुवारी पुण्यामध्ये दिमाखात साखरपुडा पार पडतोय. या खास क्षणासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले असून, या कार्यक्रमास केवळ जवळचे नातेवाईक आणि काही मोजकेच राजकीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या साखरपुड्याच्या निमित्ताने पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही आनंदवार्ता शेअर करत, 'पवार कुटुंबात नव्या सुनबाईचं आगमन होणार आहे', अशी गोड बातमी देत दोघांना शुभेच्छा दिल्या. यादरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या साखरपुड्याचे फोटो देखील शेअर केले, जे सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत.

जय आणि ऋतुजा यांनी घेतले शरद पवार यांचा आशीर्वाद:

साखरपुडा होण्याआधी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि फलटण येथील प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांनी मोदीबागेतील निवासस्थानी जाऊन आजोबा शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्या पुढील वाटचालीस आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी आजोबा शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. यादरम्यान, त्यांनी शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांना साखरपुड्याचं निमंत्रण दिलं. मागच्या काही काळात राजकीय मतभेद असताना देखील, या कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने पवार कुटुंब एकत्र आल्याचे चित्र दिसून आले.

कोण आहे अजित पवार यांची भावी सुनबाई 'ऋतुजा'?

जय पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे धाकटे पुत्र असून, त्यांचा मोठा भाऊ पार्थ पवार हा देखील राजकीय क्षेत्रात सक्रीय आहे. गेल्या काही वर्षांपासून जय पवार आणि ऋतुजा पाटील एकमेकांना ओळखत आहेत. ऋतुजा या उच्चशिक्षित असून, त्या एका नामांकित सोशल मीडिया कंपनीमध्ये कार्यरत आहेत. ऋतुजा पाटील ही एक सामाजिक जाणीव असलेली आणि त्यासोबतच आधुनिक विचारसरणीची मुलगी आहे. 'त्यांच्या सुसंस्कारित व्यक्तिमत्त्वामुळे त्या पवार घराण्याची योग्य सून ठरणार आहेत', असा विश्वास त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी व्यक्त केला आहे. ऋतुजा यांचे वडील प्रवीण पाटील यांचा सोशल मीडिया मॅनेजमेंटशी संबंधित व्यवसाय आहे आणि ते फलटणमध्ये प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणून मानले जातात.

जय आणि ऋतुजा यांच्या साखरपुड्यामुळे आनंदाचे वातावरण:

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या साखरपुड्यामुळे पवार कुटुंबात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. हा सोहळा पार पडल्यानंतर लवकरच त्यांचा विवाहसोहळादेखील पार पडेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

हा साखरपुडा राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा:

हा साखरपुडा केवळ कौटुंबिक नव्हे, तर राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा मानला जात आहे. कारण यानिमित्ताने अजित पवार आणि शरद पवार यांची पुन्हा जवळीक पाहायला मिळेल.


सम्बन्धित सामग्री