Economic crisis in Konkan: कोकणातील जनजीवन आणि अर्थव्यवस्था मुख्यतः शेती, मासेमारी आणि पर्यटन या तीन प्रमुख व्यवसायांवर आधारलेली आहे. मात्र यंदा लहरी हवामानामुळे या तिन्ही व्यवसायांना मोठा आर्थिक फटका बसला असून संपूर्ण कोकण आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे.
यंदा हापूस आंब्याचे उत्पादन आधीच 30 ते 40 टक्क्यांवर आल्याने बागायतदार चिंतेत होते. त्यातच मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरु झालेल्या अवकाळी पावसाने आंबा उत्पादनाची स्थिती अधिकच बिकट केली. त्यानंतर जूनपूर्वीच दाखल झालेल्या मान्सूनने शेवटच्या टप्प्यातील आंबा हंगामच उध्वस्त केला. परिणामी, आंबा विक्रीवर आधारित शेतकरी, व्यापार करणारे दलाल आणि आंबा प्रक्रिया उद्योग हे सर्वच अडचणीत सापडले आहेत.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील अनेक आंबा बागायतदारांचा साठा पावसामुळे खराब झाला आहे. आंब्यापासून बनणारे रस, आंबावडी, लोणचं यासारखे प्रक्रिया उद्योगही ठप्प झाले आहेत. वर्षभराचा आर्थिक भरवसा करणारा हंगाम बुडाल्याने अनेकांचे अर्थचक्र थांबले आहे.
हेही वाचा: Weather Update: मुसळधार पावसाचा तडाखा; महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत
याचबरोबर मासेमारी व्यवसायही या पावसामुळे मोठ्या संकटात सापडला. समुद्रात अचानक वाढलेल्या लाटा, वाऱ्यामुळे मच्छिमारांना आपल्याही होड्या वेळेपूर्वी किनाऱ्यावर आणाव्या लागल्या. परिणामी मासेमारीचा शेवटचा हंगाम पूर्णपणे बुडाला. अनेक मच्छीमारांना आर्थिक तोटा सहन करावा लागला असून त्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.
एप्रिल आणि मे हे कोकणातील पर्यटनासाठी अत्यंत महत्वाचे महिने मानले जातात. उन्हाळी सुटीसाठी देशभरातून पर्यटक कोकणात गर्दी करतात. मात्र यावर्षीच्या अवेळी पावसामुळे पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या लक्षणीय घटली. मालवण, गणपतीपुळे, दापोलीसारख्या ठिकाणी हॉटेल्स, होमस्टे आणि स्थानिक व्यवसायांवर त्याचा मोठा परिणाम झाला. हॉटेल व्यवसायिक, गाइड्स, वाहन चालक यांच्याही उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला.
या सर्व घडामोडींमुळे कोकणातील अर्थव्यवस्था कोलमडल्याचे जाणकार सांगतात. शेतकरी, मच्छीमार, आणि पर्यटन व्यावसायिक सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले असून शासनाने या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर तातडीने मदतीचे पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा कोकणातील असंख्य कुटुंबे दीर्घकाळ आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.