मुंबई : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बुलढाण्यात ज्वारी, कांदा आणि फळबागांचे नुकसान
बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 56 गावात शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीवरील ज्वारी कांदा त्याचबरोबर फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे जनावरांचा चारा देखील भिजला. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मान्सून पूर्व पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.
बुलढाण्यातील 56 गावांना फटका
मान्सूनपूर्व पावसाचा 56 गावांना फटका बसला आहे. उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान यामुळे झालं आहे. मे महिन्यात जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण वाढले असून त्यामुळे खरीप हंगामाच्या मशागतीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर उन्हाळी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 56 गावांमध्ये जवळपास 500 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील उन्हाळी पिके आणि फळबागांना मान्सूनपूर्व पावसाचा फटका बसला आहे. या पावसामुळे जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला असून, वीज पडून 12 जनावरांचा मृत्यु झाला आहे.
हेही वाचा : नागपूर पोलिसांची 'ऑपरेशन थंडर' मोहीम जोरात; अमली पदार्थ तस्करी विरोधात पोलीस अलर्ट
मराठवाड्यात अवकाळीचा तडाखा
महाराष्ट्रात अवकाळीचा धुमाकूळ पाहायला मिळाला आहे. अवकाळीमुळे जीवितहानी, शेतीपिकांचं नुकसान झालं आहे. शेतकरी हवालदिल झाला असून रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. मराठवाड्यात अवकाळीचा तडाखा बघायला मिळत आहे. वीज कोसळून आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला असून सतरा दिवसांत 21 जण जखमी झाले आहेत. तसेच 391 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा
पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा झाला आहे. आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात शेतीचं नुकसान झालं आहे. उभ्या पिकांना आणि फळबागांना मोठा फटका बसला आहे. प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
वाशिमच्या मालेगाव तालुक्यात जोरदार पाऊस
वाशिमच्या मालेगाव तालुक्यात जोरदार पाऊस पडला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. वाशिममध्ये घरावर वीज कोसळली मात्र त्यात जीवितहानी झाली नाही. घरातील सगळे सुखरुप आहेत.
चांदवड तालुक्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान
चांदवड तालुक्यातील शिंगवे येथील शेतकऱ्यांचे उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे समजते. मंगळवारी रात्रीच्या सुमारास मनमाड चांदवड परिसरात जोरदार पाऊस झाल्याने काढून ठेवलेला उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुमारे सहा ट्रॅक्टर काढून ठेवलेला कांदा पावसाने भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे.