महाराष्ट्र: महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून अनेक चर्चा सुरु आहेत. कोणी म्हणतंय वाढीव रक्कम मिळणारे तर कोणी म्हणतंय लाडकी बहीण योजना बंद होणार. त्यातच आता एका बड्या नेत्याने लाडकी बहीण योजनेवर मोठे भाष्य केलंय. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी हे भाष्य केलंय . दरम्यान निवडणुकीआधी महायुती सत्तेवर आल्यास 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, याबाबत अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा झालेली नाही. त्याचबरोबर या योजनेसाठी इतर योजनांचा निधी वळवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा:खोक्याच्या अटकेवर धसांची प्रतिक्रिया
काय म्हणाले रामदास कदम?
शिवसेचे नेते आणि माजी आमदार रामदास कदम यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास कदम यांनी म्हटले की, बजेट समोर ठेवून योजना चालू कराव्या लागतात, अंथरुन पाहूनच पाय पसरावे लागतात असे त्यांनी म्हटले. आज आपण लाडकी बहीण योजनेचे बजेट पाहिलं, तर ते 30, 000 कोटींपेक्षा जास्त आहे. या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेऊन आपल्याला विकासाची वाटचाल करावी लागते आणि एक लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी दहा योजना पण चालू करता येतील असेही त्यांनी थेट म्हटले.
दरम्यान महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासंदर्भात आता अनेक चर्चा रंगल्या असून सर्वच लाभार्थी लाडक्या बहिणींमध्ये धाकधूक वाढलीय. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचं नक्की काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.