छत्रपती संभाजीनगर: खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला 150 कोटी रुपयांची जमीन असल्याचे उघड झाले आहे. हैदराबादमधील सालार जंग कुटुंबाकडून हिबानामा म्हणून भेट देण्यात आली आहे. कोटींची जमीन शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावानं भेट म्हणून दिली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण सध्या संशयाच्या भोवऱ्यात आहे.
हैदराबादमधील सालार जंग कुटुंबीतील वंशजानं 150 कोटींची जमीन शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावानं भेट म्हणून दिली आहे. तीन एकर जमिनीची किंमत 150 कोटी इतकी आहे. याप्रकरणी खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे आणि त्यांचा चालक जावेद रसूल यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे.
हेही वाचा : National HIV Testing Day: एचआयव्ही रोखण्यासाठी वेळेवर चाचणी का महत्त्वाची? जाणून घ्या
हैदराबादमधील सालार जंग कुटुंबातील वंशजांपैकी एकाकडून 'हिबानामा'मध्ये (भेटवस्तू) संभाजीनगरमधील जालना रोडवरील दाऊदपुरा येथे रेडी रेकनर दरानुसार कोट्यवधी किंमतीची तीन एकरची जमीन मिळाल्याबद्दल शिवसेनेचे खासदार आणि माजी मंत्री संदीपान भुमरे आणि त्यांचे आमदार पुत्र विलास यांच्या चालकावर आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. सदर चौकशी परभणीतील एका वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीवरून करण्यात येते आहे. ड्रायव्हर जावेद रसूल शेख असं ड्रायव्हरचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेनं या ड्रायव्हरला चौकशीसाठी बोलावलं आहे. त्याच्या आयकर रिटर्नच्या प्रती, उत्पन्नाचे स्थापित स्रोत आणि त्याच्या नावावर गिफ्ट डीड कोणत्या आधारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, या प्रकरणावर खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांनी भाष्य केले आहे. तुम्ही म्हणाले म्हणून हा विषय मला माहित झाला. जरी माझा ड्रायव्हर असला तरी त्याच्या वैयक्तिक जीवनाशी माझा संबंध येत नाही असे आमदार विलास भुमरे यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना, माझ्याकडे ड्रायव्हर आहे. या नात्याने त्याने गाडी चालवायची, सकाळी गाडी घेऊन जायची, संध्याकाळी गाडी घरी आणून लावायची, त्याच्या वैयक्तिक जीवनात आमचा काही संबंध नाही असेही त्यांनी म्हटले. दिवसभर आमच्यासोबत कोणीही फोटो काढत, त्यात अनेकजण चोऱ्या करतात, हाणामारी करतात, हे आम्हाला थोडी माहित असतं, तो ड्रायव्हर आहे, त्याच्या वैयक्तिक जीवनाशी माझा काही संबंध नाही असे आमदार भुमरे यांनी म्हटले आहे.