Bird Flu In Maharashtra : महाराष्ट्रातून बर्ड फ्लू बाबत एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. आता प्राण्यानंतर माणसाला देखील बर्ड फ्लूची लागण झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धारशिव जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संशयित रूग्ण सापडला आहे. ढोकी गावात माणसाला बर्ड फ्लूची लागण झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे.
धारशिवच्या ढोकी गावात आढळलेला संशयित रुग्ण हा एक मांस विक्रेता आहे. त्याला उच्च ताप आणि इतर लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे त्याच्या स्वॅबचे नमुने पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
हेही वाचा - LPG Gas Cylinder Price Hike: एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या; किती रुपयांनी वाढली किंमत? जाणून घ्या
ढोकी गावातील पोलिस ठाणे परिसरात 21 फेब्रुवारी 2025 रोजी काही कावळे मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा 24 फेब्रुवारी रोजी बर्ड फ्लूची (H5N1) लागण झाल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने तात्काळ कारवाई करत ढोकी गावाच्या 10 किमी परिघातील परिसराला अलर्ट झोन घोषित केले. या क्षेत्रात आतापर्यंत 52 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पोलिस ठाणे परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहेत. तसेच नागरिकांना त्या भागात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय ढोकी शहरातील सर्व चिकन आणि मटण विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
मानवी संसर्गाची भीती
मृत कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर, स्थानिक आरोग्य विभागाने मांस विक्रेत्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. संशयित रुग्ण, जो मांस विक्रेता आहे, त्याला ताप आणि इतर लक्षणे दिसल्यानंतर त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत. आता या स्वॅबच्या रिपोर्टची प्रतिक्षा केली जात आहे.
पशुसंवर्धन विभाग ढोकी गावात कोंबड्यांचे सर्वेक्षण आणि तपासणी करत आहे. कोणत्याही संशयास्पद प्रकरणांची नोंद घेऊन तात्काळ उपाययोजना केल्या जात आहेत. प्रभावित क्षेत्रांमध्ये निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.
हेही वाचा - पुण्यानंतर आता लातूरमध्ये बलात्काराची घटना! 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक