मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काय सुरु आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडल्याचं चित्रं दिसत आहे. महायुतीच्या घटक पक्षांतील हा बेबनाव एकीकडे समोर येत असतानाच विरोधकही लोकांच्या प्रश्नावर बेजबाबदार असल्याचं एकंदरीत दिसत आहे. राज्यात बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात सतत बेबनाव निर्माण होत असल्याची लोकांची भावना बनत चालली आहे. एका आमदाराने आमदार निवासातील कॅंटिनमध्ये केलेली मारहाण असो किंवा थेट विधिमंडळाच्या लॉबीमध्ये दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांत झालेली झटापट असो हे सगळे प्रकार आपल्या सर्वांची मान खाली घालायला लावणारे आहेत. या गदारोळात जनतेचे खरे प्रश्न बाजूला पडत आहे.
तर मंत्री माणिकराव कोकाटे आणि दत्ता भरणे यांच्या खात्यात अदलाबदल करून महायुती सरकारने तूर्तास कोकाटेंच्या ‘रमी’वादावर तोडगा काढला. हा तोडगा काढत असतानाच तिकडे आणखी एक मंत्री संजय सिरसाट आणि मेघना बोर्डीवर पुन्हा एका वादात अडकले आहेत. अखेर या वादग्रस्त वक्तव्यांमुळे हैराण झालेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी सगळ्याच मंत्र्यांना तंबी दिली आहे. त्यामुळे आता किमान त्याचं प्रमाण कमी होईल अशी आशा आहे.
हेही वाचा: महाज्योतीच्या निधीला सरकारकडून कात्री ?, ओबीसी विद्यार्थ्यांचा भोजन, निर्वाह भत्ता अडवल्याची माहिती
एकीकडे ही परिस्थिती असली तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची राजकीय आघाडीवर जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसतं आहे. दोन्हींकडची नेतेमंडळी स्वबळाचा नारा देत आहेत. तर कुणी सावध प्रतिक्रिया देता आहे. भाजपने नेहमीप्रमाणे यात धडाका लावला असून प्रत्येक जिल्ह्यात प्रवेश सोहळ्यांचे नियोजन करून विरोधक आणि घटक पक्षांचाही कंपू कमकुवत करण्यावर भर दिला जात आहे.
महायुतीत सारं आलबेल ?
काही ठिकाणी महायुतीतील दोन पक्ष एकमेकांसमोर उभे आहेत. जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरूद्ध भाजपचे कैलास गोरंट्याल अशी जुंपली आहे. सांगलीत भाजपअंतर्गतच गोपीचंद पडळकरांना रोखण्यासाठी अण्णा डांगेंचा प्रवेश झाल्याचं बोललं जातं आहे. धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांच्या भूम-परांड्यात राष्ट्रवादीकडून राहुल मोटेंचा नुकताच पक्षप्रवेश झाला आहे. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही महायुतीत बेबनावाचं चित्र आहे.
हेही वाचा: भुमरेंच्या चालकाला मिळालेल्या जमीनीच्या किंमत ऐकून धक्का बसेल; भेट म्हणून मिळालेली जमीन किती कोटींची?
महायुतीच्या घटक पक्षांतील हा बेबनाव एकीकडे समोर येत असतानाच समोर असलेले विरोधकही सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर बेजबाबदार असल्याचं चित्रं आहे. काँग्रेसमध्ये पक्षसंघटना आणि विधिमंडळांतील लोकप्रतिनिधी यांच्यात एकवाक्यता दिसून येत नाही. तसेच महाविकास आघाडीतही आगामी निवडणुकांच्या बाबतीत निश्चित धोरण स्पष्ट होत नाही. तर मुंबईत उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्या एकत्रिकरणाची केवळ चर्चा सुरू आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही आपली भाकरी फिरवली असून शशिकांत शिंदेंना प्रदेशाध्यपदाची जबाबदारी दिलीय. आपल्या राज्याच्या विधिमंडळाची एक प्रतिष्ठा आहे. मात्र या प्रभावशाली परंपरेला विधिमंडळात लोकप्रतिनिधी करत असलेल्या कृत्याने तडे जात आहेत. हे लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे. तसेच मतदारांनीही आपले लोकप्रतिनिधी निवडताना ही काळजी घेण्याचीही तितकीच गरजं आहे. तरच भवियात या गोष्टींना आळा बसू शकेल.