मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातून अनेक नेते आणि कार्यकर्ते राजीनामा देत दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश करत आहेत. तसेच, ठाकरे गटाविरोधात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही रविवारी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले होते. अशातच, ठाकरे गटाचे सचिव संजय लाखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, सोडचिट्ठी देताना संजय लाखे पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 14 महिन्यांपूर्वी जालना लोकसभेचं तिकीट देण्याची हमी दिली होती. तिकीटाची हमी पूर्ण झाली नाही. तर अंबादास दानवे यांनी जालन्याची जिंकणारी जागा पक्षापासून दूर ठेवली', असा आरोप संजय लाखे पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा: 'औरंगजेब खूप पवित्र व्यक्ती'; माजी आमदार आसिफ शेख यांचां वादग्रस्त दावा
काय म्हणाले संजय लाखे पाटील?
'तुम्ही आमच्याकडे प्रवेश करा. जालना लोकसभा आम्ही शिवसेनेला सोडवून घेऊ आणि सांगली काँग्रेसला देऊ, असं उद्धव ठाकरे यांनी मला आश्वासन दिलं होतं. मी त्यांच्या शब्दाखातर शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी दोन ते तीन वेळेस संजय राऊत यांना जालना मतदारसंघ सोडवून घेण्याच्या स्पष्ट सूचना केल्या. पण शिवसेनेत संजय राऊत हे त्यांचा वेगळा अजेंडा चालवतात. त्या अजेंड्यानुसार त्यांनी सांगलीतील प्रस्थापित काँग्रेस विरोधी नेत्याबरोबर साटलोटं करुन विशाल पाटील खासदार होणार नाहीत, सांगली काँग्रेसकडे जाणार नाही आणि एक कमकुवत उमेदवार त्या ठिकाणी देणं अशा पद्धतीची तडजोड केली आणि सांगली शिवसेनेकडे ठेवली', असा आरोप संजय लाखे पाटील यांनी केला.
'त्यांना माहिती होतं की, ज्या मतदारसंघात शिवसेनेची एकही शाखा नाही आणि पराभव अटळ आहे, केवळ विशाल पाटील यांना थांबवणं, कमकुवत उमेदवार देणं आणि दुसऱ्याला निवडून आणणं हा अजेंडा त्यांनी राबवला. तरीही त्यानंतर मी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मी पक्षाचं संपूर्ण काम केलं. वैयक्तिक जे काही संघटनात्मक काम आहे त्यापासून मला सातत्याने वगळण्यात आलं. जिल्हास्तर ते राज्य स्तरावर हे सुरु होतं. जिल्ह्याच्या कार्यक्रमात मला वगळण्यात येत होतं', असं देखील संजय लाखे पाटील म्हणाले.
'मला संघटनात्मक जाणीवपूर्वक बाहेर ठेवण्याची वर्तवणूक देण्यात आली. माझ्या सहकाऱ्याच्या संकल्पनेतून मराठवाड्यात शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पण ती संकल्पना आपली असल्याचं अंबादास दानवे यांनी भासवत कार्यक्रम हाती घेतला. त्यांनी स्वत:च्या नेतृत्वात तो कार्यक्रम राबवला आणि आपलं नेतृत्व पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमातून आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या नियुक्त्यांमध्ये स्वत:च्या मर्जीतील कंत्राटदारांना नियु्क्ती देण्याचं काम अंबादास दानवे यांनी केलं. त्यामुळे मी राजीनामा दिला आहे', असं देखील संजय लाखे पाटील म्हणाले.