पुणे: भाजपा नेते आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी संपूर्ण राज्यात वराह जयंती साजरी करावी अशी मागणी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून नितेश राणे सातत्याने हिंदुत्ववादी भूमिका घेताना पाहायला मिळतात. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी ते कायम आग्रही असल्याचेही दिसतात. वराह म्हणजे विष्णूचा अवतार म्हणून गावागावात वराह जयंती साजरी करावी अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. यासंदर्भातील पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. नितेश राणे यांच्या वराह जयंतीच्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. वराह जयंतीला नितेश राणेंनी वराह अवतारात वावरावे अशा खोचक टोला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, "नितेश राणे पहिल्यांदा योग्य पद्धतीने बोलले आहेत. त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे. नितेश राणेंनी जयंती साजरी करण्यामध्ये पुढाकार घ्यावा. किंबहुना एक दिवस वराह अवताराचं अनुकरण करत वराह अवतारातलं वर्तन पूर्ण दिवस ठेवावं आणि त्यांच्या अनुयायांनी सुद्धा वराह अवतारात पूर्ण दिवस काढावा. दहीहंडीतील गोविंदाप्रमाणेच वराह जयंतीला नितेश राणेंनी वराह अवतारात वावरावं. फार चांगलं असेल. मी त्यांचं अभिनंदन करते."