मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 27 ऑगस्टला मुंबईकडे आंदोलनासाठी निघणार आहेत. अशातच आता मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान केल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे. या प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेची झोड उठवली जात आहे. रक्ताने मराठा असतात ते आईबद्दल अपशब्द वापरत नाहीत. अपशब्द वापरले तर जीभ हासडून देऊ असा इशारा मत्स्यव्यवसाय मंत्री तथा भाजपा नेते नितेश राणे यांनी दिला आहे.
मनोज जरांगे यांनी एका सभेत बोलताना ह्याआयचं देवेंद्र फडणवीस असं विधान केलं होतं. यावरुन आता रान पेटलं आहे. भाजपा नेत्यांनी जरांगेवर टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे. "जे रक्ताने मराठा असतात, ते कधीच कुणाच्या आईबद्दल अपशब्द वापरत नाहीत. छत्रपती शिवरायांनी आई बहिणींचा नेहमी आदरच केला आहे. जरांगेंनी आरक्षणाची लढाई लढावी, मात्र आमच्या फडणवीसांच्या आईबद्दल जर अपशब्द वापरत असतील. तर ती वळवळणारी झीभ हातात काढून देण्याचे सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कुळी मराठ्यांमध्ये आहे. हे त्यांनी लक्षात ठेवावे'', असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. तसेच फडणवीसांच्या आईबद्दल बोलणं चुकीचं असल्याचं भाजपा नेते नवनाथ बन म्हणाले आहेत.
हेही वाचा: Manoj Jarange : मनोज जरांगेंचा एल्गार! सरकार उलथवण्याची भाषा; मुंबईत येण्याचा मार्ग ठरला...
फडणवीसांच्या आईंबद्दल काय म्हणाले जरांगे?
देवेंद्र फडणवीस तुला लाज वाटली पाहिजे, तू मुख्यमंत्री आहेस. ज्या पोलिसांना सस्पेंड करायला पाहिजे होते, त्यांना तू मोठी पदं दिली. पोलिसांनी आमच्या आई-बहिणींना मारले तेव्हा त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तुझी आई तुला प्रिय आहे तशी आम्हाला आमची आई प्रिय आहे. तू मराठ्यांना आरक्षण दे तुझ्या आईची पूजा करतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.