Pune Metro: गणेशोत्सवाच्या काळात शहरात होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रो प्रशासनाने यंदा नागरिकांसाठी खास उपाययोजना केली आहे. स्वारगेट ते जिल्हा न्यायालय या मार्गावर दर तीन मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्याच्या चाचण्या सुरू आहेत. या उपक्रमामुळे कसबा पेठ आणि मंडई परिसरातील गर्दी कमी होण्यास मदत होईल, तसेच प्रवाशांना सुरक्षित आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळेल.
पुण्यातील गणेशोत्सव केवळ राज्यातच नाही, तर देशभरात आणि परदेशातूनही पर्यटक आणि भक्त या उत्सवाचा अनुभव घेण्यासाठी येतात. मध्यभागी असलेल्या गणपती मंडळांना भेट देण्यासाठी हजारो नागरिक शहरात येतात, ज्यामुळे या मार्गावर आणि मुख्य रस्त्यांवर मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर महामेट्रोने प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो सेवा सुधारण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा: Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटीलांची मुंबईकडे कूच , कसा असणार प्रवास ?
या मार्गावरील महत्त्वाची मेट्रो स्थानके म्हणजे कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट. ही स्थानके प्रवाशांना थेट गणपती मंडळाजवळ पोहोचवतील, ज्यामुळे गर्दी कमी होईल. तसेच महामेट्रोने यंदा रात्रीच्या वेळा लक्षात घेऊन मेट्रो सेवा पहाटे दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे त्या नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल जे रात्री 12 वाजेपर्यंत दर्शनासाठी येतात.
प्रत्येक मेट्रो ट्रेनची क्षमता किमान 900 प्रवासी असून, दर तीन मिनिटांनी ही सेवा सुरू ठेवली जाणार आहे. त्यामुळे मंडई आणि कसबा पेठ परिसरातील स्थानकांवर होणारी गर्दी टाळता येईल. प्रवाशांनी मार्गदर्शक सूचना पाळणे गरजेचे आहे. कसबा पेठ स्थानकावर उतरून गणपती दर्शनासाठी पुढे जाण्याचे आवाहन केले आहे, तर परतीचा प्रवास मंडई स्थानकावरून करावा, ज्यामुळे एकाच स्थानकावर गर्दी होणार नाही.
महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले, 'दर तीन मिनिटांनी मेट्रो सेवा चालवण्याच्या चाचण्या दोन दिवसांपासून सुरु आहेत. नागरिकांना सुरळीत आणि सुरक्षित प्रवास अनुभवता यावा, यासाठी आवश्यक त्या तयारी केल्या आहेत. या उपाययोजनांमुळे पुण्यातील गणेशोत्सव अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित होईल.'
हेही वाचा: Ganesh Visarjan 2025: मुंबईत गणेश विसर्जनावेळी जेलीफिश-स्टिंग रेचा धोका; स्वतःचे रक्षण कसे कराल? जाणून घ्या
या उपक्रमामुळे केवळ शहरवासीयांना नाही, तर शहरात येणाऱ्या पर्यटक आणि भक्तांनाही गर्दी कमी अनुभवता येईल, तसेच गणेशोत्सवाचा आनंद अधिक सुरक्षित वातावरणात घेता येईल. महामेट्रो प्रशासनाने प्रवाशांना सतर्क राहण्याचे आणि मार्गदर्शक सूचना पाळण्याचे आवाहन केले आहे.
पुणे मेट्रोची ही विशेष सेवा गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे, तसेच शहरातील वाहतूक आणि गर्दी नियंत्रणात राहण्यास मदत होईल.