मुंबई: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे. यासह, मराठा समाज लाखोंच्या संख्येने मुंबईतील आझाद मैदानात उपस्थित आहेत.
अशातच, एक मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, अमित शहांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सह्याद्री अतिथीगृहात विराजमान असलेल्या गणरायाचे दर्शन घेतले. तेव्हा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात मराठा समाजाच्या आरक्षण आणि आगामी महापालिका निवडणूकांबाबत चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 1 तास ही चर्चा झाली.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर अमित शहांनी घेतले बाप्पाचे दर्शन
यासह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर आले. यादरम्यान, अमित शहांनी सपत्निक मुख्यमंत्री फडणवीसांच्या गणरायाचे दर्शन घेतले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संजय राऊत संतापले
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संजय राऊत संतापले आहेत. यासह, मराठा आरक्षणावर संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. ते म्हणाले की, 'केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आहे. यासह, केंद्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चांगलं बोलणं-चालणं आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांचे आहेत तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या जवळ आहेत.दोन्ही नेत्यांचे मन वळवण्याचे आणि वेगळा कायदा करण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी करावे. आपण पाहत आहोत की आपले सर्व मराठी लोक पावसात भिजत आहेत किंवा चिखलात बसत आहेत. हे चित्र महाराष्ट्र राज्यासाठी चांगले चित्र नाही'.