Wednesday, August 20, 2025 10:36:55 AM

कोकाटेंनी तातडीने राजीनामा द्यावा; सुप्रिया सुळेंची ट्वीट करत मागणी

कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी 20 जुलै रोजी सभागृहात रमी खेळताना दिसल्याने अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला. यावर, सुप्रिया सुळेंनी देखील कोकाटेंच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली.

कोकाटेंनी तातडीने राजीनामा द्यावा सुप्रिया सुळेंची ट्वीट करत मागणी

मुंबई: कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी 20 जुलै रोजी भर सभागृहात रमी खेळताना दिसून आल्याने अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला. या दरम्यान, अनेक नेत्यांनी 'माणिकराव कोकाटेंनी कृषी मंत्री पदावरून राजीनामा द्यावा' अशी मागणी केली आहे. अशातच, शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'विद्यमान कृषीमंत्री महोदयांचा राजीनामा घेऊन हे खाते शेती आणि शेतकरी यांच्याप्रती संवेदनशीलतेने वागणाऱ्या व्यक्तीकडे द्या', अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी मंगळवारी 'एक्स'च्या माध्यमातून दिली. 

हेही वाचा: परबांच्या आरोपांना मंत्री योगेश कदमांचा प्रत्युत्तर

सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्राचा मंगलकलश स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी आणला. त्यानंतर आलेल्या शासनकर्त्यांनी आणि राज्यातील जनतेने कठोर परिश्रम करुन हा महाराष्ट्र देशातील सर्वात संपन्न असे राज्य बनविले. त्या राज्याला 'भिकारी' म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर आहे. हा राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री आणि राज्यातील जनतेच्या परिश्रमाचा अपमान आहे. हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. एकतर शेतकऱ्यांचे एवढे ज्वलंत प्रश्न उभे असताना शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय असंवेदनशील वागणारे कृषीमंत्री या राज्याने कधीही पाहिले नव्हते. त्यात सभागृहात मोबाईलवर रमी खेळून या सगळ्यांवर त्यांनी कडी केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत ते पश्चात्ताप व्यक्त करुन राजीनामा देतील अशी अपेक्षा होती. त्यापेक्षा त्यांनी राज्यालाच 'भिकारी' म्हणून कळस गाठला आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की विद्यमान कृषीमंत्री महोदयांचा राजीनामा घेऊन हे खाते शेती आणि शेतकरी यांच्याप्रती संवेदनशीलतेने वागणाऱ्या व्यक्तीकडे द्या'.

नेमकं प्रकरण काय?

20 जुलै रोजी सकाळी, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे भर विधानसभेच्या सभागृहात 'जंगली रमी' खेळत होते. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील दिले आहे. 'जंगली रमी पे आओ ना महाराज.. खरंतर सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपाला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात दररोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना देखील, सभागृहात काहीच काम नसल्यामुळे कृषीमंत्री कोकाटे यांच्यावर रमी खेळण्याची वेळी येत असावी', असा टोला रोहित पवारांनी लगावला.

'माझं काम पारदर्शी आहे' कोकाटे

'वरच्या सभागृहात कामकाज तहुकुब झाल्याने मी तिथे बसलो होतो. त्यामुळे, खालच्या सभागृहात काय सुरू आहे? हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला. मोबाईल ओपन केल्यानंतर जेव्हा मी युट्युबवर जात होतो, तेव्हा अनेक जाहिराती माझ्या समोर आले. त्या जाहिराती स्किप कराव्या लागतात. त्या जाहिराती स्किप करताना दोन-तीन सेकंद लागले. तेव्हा, त्यांनी 18 सेकंदाचाच व्हिडिओ दाखवला. त्यांनी पुढचा व्हिडिओ दाखवलाच नाही. ते कधी माझ्या कपड्यावर बोलतात. तर कधी माझ्या कधी माझ्या गाडीवर बोलतात. पण माझ्या धोरणावर, माझ्या कामावर आणि मी शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपाययोजनांवर कोणताही विरोधी पक्षाचा नेता बोलत नाही. माझं काम पारदर्शी आहे. माझा स्वभाव स्पष्ट आहे. कोणत्याही प्रकारे सभागृहात बसू नये, हा नियम मला माहीत आहे', अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकाटेंनी दिली. 

हेही वाचा: नागपूर विमानतळ प्रशासनाला धमकीचा मेल; शोध मोहीम सुरू

'रमी'वर स्पष्टीकरण देत कोकाटे म्हणाले... 

'सभागृहात अनेक कॅमेरे सुरू असतात. मी कशाला गेम खेळत बसू? गेम खेळण्याचा मुद्दाच येत नाही. मी स्किप करण्यासाठी प्रयत्न केला. माझ्या लक्षात नाही आलं की लगेच कसं स्किप करतात? पण स्किप झालेला व्हिडिओ तुम्ही दाखवलाच नाही. एकदा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. मग तुमच्या लक्षात येईल की मी स्किप केलं की नाही? कोणी व्हिडिओ शूट केला याबद्दल काहीच हरकत नाही. मात्र, माझ्या खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे? ते बघण्यासाठी मी मोबाईलवर युट्युब बघत होतो. त्यावर डाऊनलोड झालेला गेम मी स्किप करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, स्किप करताना तिथे कोणीतरी माझा व्हिडिओ काढला असावा', असं कृषिमंत्री कोकाटे म्हणाले. 

रोहित पवारांवर टीका करत कोकाटे म्हणाले की, 'आतापर्यंत माझ्या संदर्भात रोहित पवारांचे काय प्रश्न आहे? शेतकऱ्यांसंदर्भात काय प्रश्न आहे? शेतकऱ्यांची काळजी त्यांनाच आहे का? आम्हाला नाही का? आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो, विभागात जातो, शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो, नवीन धोरण तयार करतो, इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसत नाही. हे रिकामे उद्योग कसे दिसतात? उगीचच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना जनता बळी पडणार नाही'. 


सम्बन्धित सामग्री