MPSC Exams in Marathi: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेतल्या जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. बुधवारी राज्य विधान परिषदेत शिवसेना (यूबीटी) आमदार मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली. कृषी आणि अभियांत्रिकी विषयांशी संबंधित काही परीक्षा फक्त इंग्रजीत का घेतल्या जातात? याकडे नार्वेकर यांनी लक्ष वेधले होते. अभियांत्रिकीशी संबंधित परीक्षा मराठीत का घेतल्या जात नाहीत? असा सवाल त्यांनी विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'या परीक्षा आधीच मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत घेतल्या जातात. तथापि, न्यायालयाने काही प्रकरणांमध्ये असा निर्णय दिला होता की काही विशिष्ट परीक्षा, विशेषतः कृषी अभियांत्रिकीशी संबंधित, फक्त इंग्रजीमध्येच घेतल्या पाहिजेत.'
हेही वाचा - 'शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास'
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, जेव्हा हे प्रकरण न्यायालयात नेण्यात आले तेव्हा सरकारी पातळीवर चर्चा झाली आणि असे आढळून आले की, या विषयांची पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध नाहीत. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने युक्तिवाद मान्य केला.
हेही वाचा - 'मी मराठी बोलणार नाही, करायचं ते करा!'– एअरटेल कर्मचाऱ्याच्या वर्तनावर मराठी जनतेचा संताप!
मराठी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू -
तांत्रिक विषयांसाठी मराठी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, 'राज्य सरकारने आता निर्णय घेतला आहे की जरी सध्या पाठ्यपुस्तके उपलब्ध नसली तरी, नवीन शिक्षण धोरणामुळे आपल्याला अभियांत्रिकी अभ्यासक्रम मराठीत घेण्याची परवानगी मिळते. त्यामुळे, अभ्यास साहित्याच्या कमतरतेमुळे मराठीत न झालेल्या एमपीएससी परीक्षा नवीन पाठ्यपुस्तकांसह घेतल्या जातील.'
दरम्यान, अभ्यास साहित्याच्या कमतरतेमुळे मराठीत न घेतलेल्या MPSC परीक्षांना नवीन पाठ्यपुस्तकांसह पाठिंबा दिला जाईल. MPSC सोबत एक संरचित वेळापत्रक निश्चित केले जाईल आणि या परीक्षा देखील मराठीत घेतल्या जातील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. या निर्णयामुळे MPSC परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या परंतु भाषेच्या अडथळ्यामुळे अडचणींना तोंड देणाऱ्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांना फायदा होण्याची अपेक्षा असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.