मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिल रोजी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर हा हप्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक महिलांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. यावेळी लाभार्थ्यांची संख्या वाढमहत्वाचे णार की घटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या योजनेची सुरुवात जुलै 2024 मध्ये करण्यात आली होती. राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर ही योजना महायुती सरकारसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. जानेवारीपासून पात्र महिलांची छाननी करण्यात येत असून, फसवणूक रोखण्यासाठी कडक निकष लावण्यात आले आहेत. काही महिलांनी चुकीची माहिती देत लाभ घेतल्याचे उघड झाल्यानंतर ही प्रक्रिया अधिक काटेकोर करण्यात आली आहे.
महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. त्यांनी स्पष्ट केलं होतं की ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी आहे. त्यामुळे 65 वर्षांचा वयोगट ओलांडणाऱ्या महिलांना पुढे हप्ता मिळणार नाही. तसेच, विवाहानंतर इतर राज्यांत स्थलांतरित झालेल्या महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे. सध्या अंदाजे 1.20 लाख महिलांचा वयोमर्यादा ओलांडल्यामुळे योजनेतून वगळण्यात आलं आहे. जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून, महिलांच्या जीवनात बदल घडवण्याचे कार्य सुरु आहे.
सध्या एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्याच्या तयारीत असलेल्या महिलांमध्ये उत्साह आहे. मागील हप्त्याच्या तुलनेत या वेळी किती महिलांच्या खात्यात रक्कम जमा होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण गेल्या वेळी लाभार्थ्यांची संख्या वाढलेली होती. त्यामुळे सध्याची आकडेवारी कशी असेल आणि सरकारकडून आणखी काय निर्णय घेतले जातील, याकडे सर्वांचे लक्ष आहे.