जळगाव: मुंबईहून अमरावतीला जाणाऱ्या अमरावती एक्सप्रेसचा मोठा अपघात झाला. जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वले स्थानकाच्या जवळ धान्याने भरलेला ट्रक रुळावर आल्याने हा अपघात घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बोदवड-नांदगावजवळ रेल्वे गेट तोडून धान्याने भरलेला ट्रक रुळांवर अडकून पडला होता. त्याचवेळी, सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास मुंबईहून अमरावतीला जाणारी अमरावती एक्सप्रेस त्या ट्रकला धडकली. या अपघातामुळे ट्रकचा चक्काचूर झाला, तर रेल्वेच्या इंजिनलाही मोठा फटका बसला.
अपघात टाळण्यासाठी रेल्वे चालकाने प्रसंगावधान राखून गाडीचा वेग कमी केला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अपघातानंतर रेल्वे रुळांवर ट्रक अडकून पडल्यामुळे रेल्वे सेवा काही काळ विस्कळीत झाली.
हेही वाचा: खोक्या भाईला महाराष्ट्रात आणलं, थोड्याच वेळात बीडला आणणार
अपघातग्रस्त ट्रक हटवण्याचे काम वेगाने सुरू असून, अन्य गाड्या काही अंतरावर थांबवण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.