मुंबई: पावसाने ओळखली जाणारी मुंबई शहर सध्या मात्र कोरड्या हवामानाचा सामना करत आहे. जुलै महिना मान्सूनचा सर्वात जास्त पावसाचा काळ समजला जातो, पण यंदा जुलैच्या पहिल्या 13 दिवसांतच पावसाचा जोर कमी झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार, मुंबईतील कुलाबा वेधशाळेत केवळ 109 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर सांताक्रूझ वेधशाळेत 179 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हे आकडे जुलै महिन्याच्या सरासरी प्रमाणात प्रचंड कमी आहेत. कुलाबा येथील जुलै महिन्याची सरासरी 768.5 मिमी असून सांताक्रूझसाठी ती 919.9 मिमी आहे. याउलट, जून महिन्याच्या अखेरीस मात्र मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती आणि त्यावेळी कुलाबा येथे जून महिन्याची सरासरी (542.3 मिमी) ओलांडली होती.
1 जूनपासून आतापर्यंत मुंबईत कुलाबा येथे एकूण 701 मिमी तर सांताक्रूझ येथे 692 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यातील बहुतेक पाऊस जून महिन्यात पडला असून, जुलैमध्ये मात्र पावसाने हात आखडता घेतल्याचं स्पष्ट होत आहे.
हेही वाचा: नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश
मुंबईत कोणताही मोठा हवामान बदल नाही
भारतीय हवामान विभागाने सोमवारीपासून गुरुवारीपर्यंत मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, शहरात जोरदार पावसासाठी आवश्यक असलेले हवामान स्थिती किंवा मोसमी वारे सध्या नसल्याने पावसाच्या जोरात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
तथापि, ठाणे, पालघर आणि रायगड या शेजारील जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने गुरुवारी यलो अलर्ट जारी केला आहे, ज्यामुळे त्या भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा: शिवसृष्टीच्या भूसंपादनात भ्रष्टाचाराचा आरोप; माजी आमदार वैभव नाईक यांचा सरकारवर हल्लाबोल
मध्य आठवड्यापासून पाऊस वाढण्याची शक्यता
स्वतंत्र हवामान तज्ञ राजेश कापडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'गेल्या काही दिवसांत मुंबईत पावसाचा अभाव होता. मात्र, सोमवारी काही ठिकाणी तुरळक सरींची शक्यता आहे. किनारपट्टीवर सौम्य चक्राकार स्थिती निर्माण होत असल्याने पुढील ३६ तासांत मुंबईत 25 ते 35 मिमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. गुरुवारपासून पावसाच्या सरींच्या संख्येत आणि तीव्रतेत हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.'
दरम्यान, सध्या मुंबईकरांना केवळ हलक्या सरी व उडणाऱ्या थेंबांवर समाधान मानावे लागत आहे. शहरातील जलाशयांची स्थिती लक्षपूर्वक पाहिली जात आहे.
सध्याची परिस्थिती पाहता, जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मुसळधार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यातही समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यास, मुंबईकरांना शेवटी जुलैच्या अखेरीस खऱ्या अर्थाने मान्सूनचा अनुभव घेता येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मुंबईकर मात्र आता आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहेत.