तेजस मोहातुरे. प्रतिनिधी. नागपूर: आजपर्यंत 'लुटेरी दुल्हन' तुम्ही फक्त टीव्ही मालिकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये पाहिला असाल. 2015 मध्ये 'डॉली की डोली' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यात डॉली नावाची एक हुशार आणि मोहक तरुणी एका मागून एक लग्न करत श्रीमंत नवऱ्यांना लुटत असे. अशीच एक घटना नागपुरात घडली आहे. एका महिलेने सोशल मीडियावर प्रेमाचे जाळे टाकून तब्बल 2 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.
नेमकं प्रकरण काय?
नागपुरातातील एका महिलेने सोशल मीडियावर प्रेमाचे जाळे टाकून तब्बल 2 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस झाले आहे. विशेष म्हणजे, या लुटेरी दुल्हने तब्बल 8 पेक्षा अधिक लोकांना लुटले. या लुटेरी दुल्हनचे नाव आहे समीरा. शादी डॉटकॉमसारख्या मॅट्रिमोनियल साईट्सचा वापर करून या लुटेरी दुल्हने अनेक पुरुषांना आपल्या जाळ्यात अडकवले. गेल्या दीड वर्षांपासून ही महिला पोलिसांच्या रडारवर आहे. ही लुटेरी दुल्हन श्रीमंत, प्रतिष्ठित व्यक्तींना टार्गेट करत स्वतःला घटस्फोट महिला आहे, असे म्हणत लग्न करत होती. लग्न झाल्यावर थोडा काळ संसाराचा अभिनय करायचं आणि मग सुरू व्हायचं ब्लॅकमेलिंगचं सत्र. अखेर पोलिसांनी या लुटेरी दुल्हनला नागपुरातील सदर परिसरातून ताब्यात घेतले.
फिर्यादी पती गुलाम पठाण यांनी माहिती दिली की, '2010 पासून तिने अनेक पुरुषांशी लग्न करून त्यांची फसवणूक केली. लग्नानंतर ती त्यांना ब्लॅकमेल करायची. नवीन नवऱ्याकडून ती पैसे उकळायची. आतापर्यंत तिने 8 लग्न केले आणि त्यातील एकाही व्यक्तीशी तिचा घटस्फोट झालेला नाही'. या लुटेरी दुल्हनने आपली फसवणूक केली, याची माहिती मिळताच पीडित पती गुलाम पठाण यांनी दीड वर्षापूर्वी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.