पुणे: पुण्यातील बहुचर्चित पोर्श प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे. गेल्या वर्षी पुण्यात दारू पिऊन पोर्श कार चालवून दोन लोकांना चिरडल्याचा आरोप असलेल्या 17 वर्षीय मुलावर अल्पवयीन म्हणून खटला चालवला जाईल, असे बाल न्याय मंडळाने मंगळवारी सांगितले. बाल न्याय मंडळाच्या या विधानामुळे या प्रकरणात परिस्थिती निश्चितच अधिक गंभीर झाली आहे. अहवालानुसार, राष्ट्रीय स्तरावरील बातम्यांमध्ये स्थान मिळवणारी ही घटना 19 मे 2024 रोजी कल्याणी नगर परिसरात घडली. आयटी व्यावसायिक अनिश अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा, मोटारसायकलवरून जात होते. या दोघांचा या कार अपघातात मृत्यू झाला होता.
हेही वाचा - धक्कदायक बातमी: पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 14 हरणांचा मृत्यू
पुणे पोलिसांनी गेल्या वर्षी आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी केली होती. तसेच आरोपीने पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न देखील केला होता. तथापि, बचाव पक्षाच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, पुणे पोलिसांचे म्हणणे ऐकल्यानंतर, बाल न्याय मंडळाने मंगळवारी आरोपी मुलाला प्रौढ म्हणून वागवण्याची त्याची विनंती फेटाळून लावली. अपघातानंतर काही तासांतच, पुण्यातील पोर्श कार अपघातातील अल्पवयीन आरोपीसोबत उपस्थित असलेल्या अल्पवयीन मुलांच्या रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी आरोपी आणि इतर दोन जणांना अटक केली होती. वृत्तांनुसार, पोर्श कार अपघातातील मुख्य आरोपीची आई ही रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या दहा आरोपींपैकी पहिली होती, ज्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले. तथापि, अपघातानंतर काही तासांतच 19 मे 2024 रोजी आरोपी अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला.
हेही वाचा - तुझ्या बापाकडून 20 लाख रुपये घेऊन ये; सासरच्या छळाला कंटाळून छकुलीची आत्महत्या
जामिनाच्या अटींवरून गोंधळ -
दरम्यान, आरोपी मुलाच्या जामीनासाठी त्याला रस्ता सुरक्षेवर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगण्यात आले. जामिनाच्या अटींमुळे देशभर हे प्रकरण चर्चेला आले. त्यानंतर त्याला तीन दिवसांनी पुणे शहरातील सुधारगृहात पाठवण्यात आले. तथापी, 25 जून 2024 रोजी, मुंबई उच्च न्यायालयाने मुलाला ताबडतोब सोडण्याचे निर्देश दिले आणि म्हटले की, बाल न्याय मंडळाने त्याला निरीक्षण गृहात पाठवण्याचे आदेश बेकायदेशीर असून अल्पवयीन मुलांशी संबंधित कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी केली पाहिजे.