विनायक पवार. प्रतिनिधी. पनवेल: शनिवारी सकाळी पनवेल येथे धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. पनवेल शहरातील तक्का परिसरात स्वप्नालय बालगृहाजवळील फुटपाथवर एक नवजात अर्भक कोणीतरी सोडून गेल्याची घटना घडली. शुक्रवारी, मध्यरात्रीच्या सुमारास परिसरातील नागरिकांना बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. या घटनेची माहिती मिळताच, नागरिकांनी पोलिसांना याची माहिती देत, नवजात अर्भकाला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. पनवेल शहरातील तक्का परिसरात नवजात अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
शुक्रवारी, मध्यरात्रीच्या सुमारास पनवेल शहरातील तक्का परिसरातील स्वप्नालय बालगृहाजवळ असलेल्या फुटपाथवर एका अज्ञात व्यक्तीने बास्केटमध्ये नवजात अर्भक ठेवलं होतं. त्यानंतर ती व्यक्ती फरार झाली. त्यानंतर, नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रभर बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. त्यामुळे, क्षणाचाही विलंब न करता परिसरातील नागरिकांनी पनवेल शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर सर्वप्रथम त्या बाळाला पनवेलमधील सिद्धी क्लिनिक येथे नेण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी बाळाची तपासणी केली आणि बाळ सुखरूप असल्याची खात्री करून पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. सध्या पनवेल पोलीस या बाळाची काळजी घेत आहे. पोलिसांकडून बाळाच्या आईचा शोध सुरू असून, परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. या फुटेजमध्ये एक बुरखा घातलेली महिला त्या परिसरात संशयास्पद फिरत असल्याचे दिसून येत आहे.