Newborn girl found in sack प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
पालघर: पालघरमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. गुरुवारी एका अज्ञात व्यक्तीने नालासोपारा पश्चिमेतील कळंब पुलाजवळील झुडपात एका महिन्याच्या बाळाला पोत्यात टाकून दिले. नवजात मुलगी गंभीर अवस्थेत आढळली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून एका दुचाकीस्वाराने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुलीला रुग्णालयात नेले आणि तिच्यावर उपचार सुरू केले.
नालासोपारा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. वरिष्ठ निरीक्षक विशाल वळवी यांनी मिड-डेशी बोलताना सांगितले की, आम्ही मुलीला रुग्णालयात नेले आणि तिच्यावर आवश्यक उपचार केले. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. आरोपीची ओळख पटविण्यासाठी आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत. शिवाय, अलिकडच्या प्रसूतींबद्दल माहिती गोळा करण्यासाठी आम्ही स्थानिक रुग्णालये आणि प्रसूती केंद्रांशी देखील संपर्क साधत आहोत.
हेही वाचा - NAVI MUMBAI: 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नवजात मुलीला इतक्या निर्दयीपणे कोणी सोडले असेल, असा प्रश्न आता परिसरातील लोकांना पडला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्यांची कारवाई वाढवली आहे. त्यांनी नागरिकांना कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे असे आवाहन केले आहे.
हेही वाचा - शिंदेंच्या ऑफिसबाहेर कचऱ्याचा ढीग; 'जय महाराष्ट्र'च्या प्रतिनिधीवर अधिकाऱ्याची अरेरावी
तथापी, या घटनेमुळे समाजात मानवी संवेदनांचा अभाव किती प्रमाणात वाढला आहे, यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. आरोपीची ओळख अद्याप पटलेली नाही, परंतु पोलिसांनी हे प्रकरण सोडवण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.