Wednesday, August 20, 2025 02:10:23 PM

पैठण तालुक्यात वादळी वाऱ्याचा कहर; थेरगाव व परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

पैठण तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी मोठा तडाखा दिला; थेरगाव, वडजी, मुरमा, कोळीबोडखा, केकत जळगाव येथील शेतकऱ्यांचे टोमॅटो, केळी, हिरवी मिरची, कांदा, डाळिंब, पपई पिकांचे मोठे नुकसान झाले.

पैठण तालुक्यात वादळी वाऱ्याचा कहर थेरगाव व परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मंगळवारी सायंकाळी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांनी मोठा तडाखा दिला. विशेषतः पाचोड परिसरातील थेरगाव, वडजी, मुरमा, कोळीबोडखा, केकत जळगाव या गावांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यांमुळे शेकडो घरांच्या छपरांवरील पत्रे उडून गेले, तर अनेक झाडे उन्मळून पडली. शेतात तयार असलेली टोमॅटो, केळी, हिरवी मिरची, कांदा, डाळिंब, पपई आदी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत.

थेरगाव येथील बाळू बांगर यांच्या घरावर लिंबाचे झाड कोसळल्याने त्यांचे घर पूर्णपणे पडून गेले आहे. वडजी येथील अशोक आणि कृष्णा भांड यांची डाळिंबाची बाग वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली आहे. शाळेवरील पत्रे उडून गेल्यामुळे शाळा उघड्यावर आली आहे. शेतात उभारलेले शेडनेट व रेशीम शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. शरद व सोमा निर्मळ यांची टोमॅटो व केळीची पिके उद्ध्वस्त झाली. अनेक जनावरांचे चारा भिजून गेला असून जनावरेही जखमी झाल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: साताऱ्यातील शाहू कला मंदिर नाट्यगृहाची दुरावस्था; सयाजी शिंदे यांची तीव्र खंत

सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे लोकांना काही समजण्याच्या आतच मोठे संकट घडले. विजेचे खांब, तारा तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. पावसामुळे आंब्याच्या कैऱ्याही गळून पडल्या आहेत. बकान, बाभूळी, लिंब, मोसंबी यांची झाडे मोडून पडली आहेत.

सध्या शेतकरी मान्सूनपूर्व मशागत करत होते. मात्र या अवकाळी पावसामुळे त्यांची मेहनत वाया गेली आहे. आधीच हमीभावाचा प्रश्न भेडसावत असताना आता निसर्गाच्या कोपामुळे शेतकरी आणखी अडचणीत आले आहेत. जनावरांसाठी गोळा केलेला चारा, शेतात काढलेले पिके भिजल्यामुळे आर्थिक फटका बसला आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तात्काळ पंचनामे करून योग्य आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या संकटामुळे बळीराजाचे जीवन अधिक कठीण झाले असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.


सम्बन्धित सामग्री