विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सय्यदपुर येथील गावाला जोडणारा नळकांडी पुल वाहून गेल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. अशातच, सय्यदपुर येथील कोमल अजय सिरसाठ यांना प्रसुती वेदना होत असल्याने सोमवारी सायंकाळी सहा वाजता गुडघाभर पाण्यातून वाट काढत लाडसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागले.
हेही वाचा: नांदणीची 'महादेवी' हत्तीण अंबानींच्या 'वनतारा'कडे रवाना; गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
दुधना नदीला मोठा पूर आल्याने लाडसावंगी सय्यदपुर गावाला जोडणारा नळकांडी पुल वाहून गेला. शिवाय, सोमवारी सय्यदपुर गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावातील विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारण्याची वेळ आली. या गावातील पन्नास विद्यार्थ्यांना लाडसावंगी येथील शाळेत दररोज यावे लागते. अशातच, सोमवारी सायंकाळी 6:30 वाजल्याच्या सुमारास कोमल सिरसाठ यांना प्रसुती पुर्व वेदना सुरू झाल्याने घरातील महिलांनी गुडघाभर पाण्यातून वाट काढत कोमल सिरसाठ यांना आरोग्य केंद्रात आणले.