Wednesday, August 20, 2025 09:27:24 AM

नागपूर-पुणे वंदे भारत ट्रेनचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे प्रवाशांशी व लहान मुलांशी संवाद साधला.

नागपूर-पुणे वंदे भारत ट्रेनचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
Nagpur-Pune Vande Bharat Train inaugurated by PM Modi
Edited Image

नागपूर: नागपूर ते पुणे दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सेवेचे उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने रेल्वे प्रशासनाने विशेष तयारी केली होती. उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे प्रवाशांशी व लहान मुलांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी वंदे भारत एक्सप्रेसच्या अत्याधुनिक सुविधांबाबत माहिती घेतली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नवीन वंदे भारत एक्सप्रेसमुळे नागपूर–पुणे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. हाय-स्पीड, आधुनिक डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या या गाडीमुळे प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. या सेवेमुळे नागपूर आणि पुणे यांमधील व्यापार, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी आज बेंगळुरूतील केएसआर रेल्वे स्थानकावरून एकाच वेळी तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये बेंगळुरू–बेळगाव, अमृतसर–श्री माता वैष्णो देवी कटरा आणि नागपूर (अजनी)–पुणे वंदे भारत गाड्यांचा समावेश आहे. या हाय-स्पीड ट्रेनमुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढेल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि प्रवाशांना जागतिक दर्जाचा प्रवास अनुभव मिळेल, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - महाज्योतीच्या निधीला सरकारकडून कात्री ?, ओबीसी विद्यार्थ्यांचा भोजन, निर्वाह भत्ता अडवल्याची माहिती

शनिवारीच पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली होती. त्यांनी 10 ऑगस्ट रोजी बेंगळुरूमध्ये येऊन केएसआर स्टेशनवरून तीन वंदे भारत गाड्यांचे उद्घाटन, बेंगळुरू मेट्रोच्या यलो लाईनचे लोकार्पण आणि मेट्रो फेज-3 च्या पायाभरणीचा कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले होते.

हेही वाचा - भुमरेंच्या चालकाला मिळालेल्या जमीनीच्या किंमत ऐकून धक्का बसेल; भेट म्हणून मिळालेली जमीन किती कोटींची?

दुपारी 1 वाजता बेंगळुरूमध्ये झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी आरव्ही रोड (रागीगुड्डा) ते बोम्मासंद्रा दरम्यानच्या 19 किमीहून अधिक लांबीच्या यलो लाईनचे उद्घाटन केले. 16 स्थानक असलेल्या या मार्गावर 7160 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यामुळे बेंगळुरू मेट्रोचे ऑपरेशनल नेटवर्क 96 किमीपेक्षा अधिक झाले आहे, ज्याचा लाभ मोठ्या लोकसंख्येला मिळणार आहे. याशिवाय पंतप्रधान मोदींनी 15610 कोटी रुपयांच्या खर्चाच्या बेंगळुरू मेट्रो फेज-3 प्रकल्पाची पायाभरणीही केली. या सर्व प्रकल्पांमुळे कर्नाटकातील तसेच शेजारील राज्यांतील वाहतूक आणि कनेक्टिव्हिटीला नवी दिशा मिळणार आहे.
 


सम्बन्धित सामग्री