पुणे: पवना धरणाच्या ठाकुरसाई रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या अनोळखी व्यक्तीने एका महिलेला निर्जळ स्थळी घेऊन जात तिच्यावर बळजबरी केली. ही हृदयद्रावक घटना 15 जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. पावसामुळे रस्ता सुनसान होता आणि नेमका याचाच फायदा नराधमाने घेतला. या प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला अटक केली आहे.
पीडित महिला एका डोंगरी भागात राहणाऱ्या कातकरी समाजातील असून ती पावसात छत्री घेऊन एकटीत रस्त्याच्या कडेला चालत होती. या संधीचा फायदा घेत आरोपीने तिचा पाठलाग केला. पुढे गाडी आडवी लावून तिला शेताच्या बांधाजवळील झुडपात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. महिलेने आरडाओरडा केला परंतु पावसामुळे आसपास कोणीही नव्हते. आरोपीने अमानुष कृत्य केल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला.
हेही वाचा: Pune Crime: एकट्या महिलेला गाठून भरपावसात तिच्यावर बलात्कार, नवऱ्याने घेतला संशय
पीडित महिला घाबरल्याने थेट आपल्या पतीकडे गेली. मात्र त्याने तिच्यालरट संशय घेतला आणि तिला घराबाहेर काढले. नाईलाजास्तव ती आईकडे गेली आणि संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर तिने 16 जुलै रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.
विशेष म्हणजे पीडितेच्या मदतीने संशयिताचे रेखाचित्र तयार करण्यात आले. त्या चित्राची मदत घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी नराधमाला अटक केली. बाळू दत्तु शिर्के असे आरोपीचे नाव असून तो पुण्यातील मावळ तालुक्यातील जिवन येथील रहिवाशी आहे.
पीडित महिलेने अत्याचाराची तक्रार पोलिसात दाखल केली. त्यानंतर अवघ्या 24 तासात आरोपीचा पर्दाफाश करण्यात आला. महिलेने वर्णन केलेल्या गोष्टींवरुन आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले. त्यानंतर ही जलद कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक निरीक्षक विजया म्हात्रे करत असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.