पुणे: पिंपरी चिंचवड शहरात एका अज्ञात व्यक्तीने दहशत माजवली आहे. चेहऱ्याला मास्क लावून हा मास्कमॅन दिवसाढवळ्या रस्त्यावर फिरत आहे. चेहऱ्यावर मास्क, हातात धारदार चाकू घेऊन रस्त्यावर फिरताना हा मास्कमॅन पाहायला मिळत आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर येत आहे. निगडीतील बजाज ऑटोमोबाईल समोरील एचपी पेट्रोल पंप परिसरात ही घटना घडली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
नेमकं झालं काय?
पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरात चेहऱ्याला मास्क आणि हातात धारदार चाकू घेऊन मास्कमॅन रस्ता ओलांडत आहे. लोकांची वर्दळ आणि वाहनांच्या गर्दीतून हा मास्कमॅन फिरत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर येत आहे. या व्हिडीओमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे निगडी परिसरातील नागरिकांनी पोलिसात धाव घेतली आहे. मास्कमॅनबद्दल भीती व्यक्त करत हा संपूर्ण प्रकार स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सांगितला आहे. तसेच या प्रकरणात दखल घेण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा: Elvish Yadav House Firing: यूट्युबर एल्विश यादवच्या घरावर गोळीबारप्रकरण, अखेर मुख्य आरोपीचा एन्काऊंटर
नागरिकांची पोलिसांकडे मास्कमॅनवर कारवाई करण्याची मागणी
मास्कमॅन चेहऱ्यावर मास्क लावून फिरत आहे, त्याचा चेहरा पूर्णपणे झाकलेला आहे. त्यामुळे त्याची ओळख पटणं कठीण झालं आहे. तसेच तो सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्र घेऊन फिरत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांची भीती आहे. सार्वजनिक
ठिकाणी चेहऱ्यावर मास्क आणि हातात धारदार शस्त्र घेऊन फिरणे अत्यंत गंभीर आहे. मास्कमॅनमुळे परिसरातील नागरिक चिंतेत आहेत. त्यांनी मास्कमॅनला ताब्यात घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर आता मास्कमॅनच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याआधी पुण्यात कोयता गँगची दहशत
पुण्यात याआधी मे महिन्यात कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली होती. रात्रीच्या वेळी भररस्त्यात तरुणांचा वाद झाला आणि त्यातून कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. आता पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क मॅनमुळे नागरिकांमध्ये भीती आहे. त्यामुळे पोलिसांनी मास्कमॅनला तातडीने कारवाई करून पकडलं नाही तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.