Ganeshotsav 2025: गणेशोत्सव 2025 निमित्त पुणे मेट्रोकडून भाविकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. उत्सवाच्या काळात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मेट्रोने सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवादरम्यान पुण्यात पहाटे 2 वाजेपर्यंत गाड्या धावतील. तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी तब्बल 41 तास नॉनस्टॉप सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
गणेशोत्सवासाठी खास वेळापत्रक -
27 ते 29 ऑगस्ट : सकाळी 6 ते रात्री 11 (नियमित वेळापत्रक)
30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर : सकाळी 6 ते पहाटे 2 वाजेपर्यंत
6-7 सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) : सलग 41 तास सेवा (६ सप्टेंबर सकाळी 6 ते 7 सप्टेंबर रात्री 11 वाजेपर्यंत)
8 सप्टेंबरपासून : नियमित वेळापत्रक पुन्हा सुरू होईल.
मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या काळात अतिरिक्त फेऱ्या देखील सुरू करण्यात येतील. पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांजवळील जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट ही स्थानके भाविकांसाठी सोयीस्कर ठरणार आहेत. या स्थानकांमुळे भाविकांना थेट मंडळांपर्यंत पोहोचणे सोपे होईल आणि शहरातील रस्त्यावरील वाहतुकीपासून मोठा दिलासा मिळेल.
पहिल्यांदाच भूमिगत मार्ग सुरू
या वर्षी, पुणे मेट्रोच्या भूमिगत मार्गाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानचा हा मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात आला असून यात कसबा पेठ आणि मंडई स्थानकांचाही समावेश आहे. हा मार्ग शहराच्या मध्यभागातून जात असल्याने प्रमुख गणेश मंडळांजवळ पोहोचणे आणखी सोपे झाले आहे.
हेही वाचा - Pune News: पुण्यातील मंडळांच्या वादावर पोलिसांनी काढला तोडगा; 'विसर्जन मिरवणूक आता या वेळेत...
दरम्यान, पुणे मेट्रोचे जनसंपर्क आणि प्रशासन संचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितलं की, गर्दी हाताळण्यासाठी पुणे मेट्रोने सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गाड्या मध्यरात्रीपर्यंत धावतील आणि आणखी फेऱ्या जोडल्या जातील. अनंत चतुर्दशीला, मेट्रो 7 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत 41 तास सतत धावेल.
हेही वाचा - ST Employees In Maharashtra : गणेशोत्सवापूर्वीच मिळणार एसटी कर्मचाऱ्यांना पुढील महिन्याचा पगार?; परिवहनमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
भाविकांसाठी दिलासा -
गणेशोत्सवादरम्यान दरवर्षी हजारो भाविक शहरात येऊन गणेश मंडळांच्या दर्शनाचा लाभ घेतात. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मेट्रोची ही विशेष सेवा भाविकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि त्रासमुक्त प्रवास देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.