पुणे: राहाता पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मोठी आणि लक्षवेधी कारवाई करत लाखो रुपयांचे प्रतिबंधित मांगूर मासे पकडले आहेत. या कारवाईत पोलिसांनी सुमारे साडेचार हजार किलो मासे जप्त केले असून त्यांची एकूण किंमत अंदाजे 4 लाख 60 हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे मासे पुणे जिल्ह्यातील भिगवण येथून मध्य प्रदेशात तस्करीसाठी नेत होते, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.
अहिल्यानगर परिसरात राहाता पोलिस ठाण्याचे पथक नेहमीप्रमाणे वाहनांची तपासणी करत होते. त्याच दरम्यान एक ट्रक संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला थांबवले आणि तपासणी केली असता, त्यामध्ये भारत सरकारने बंदी घातलेले मांगूर प्रजातीचे मासे आढळले. पोलिसांनी तात्काळ ट्रकमधील चालक आणि त्याच्या सहकाऱ्याला ताब्यात घेतले आणि अधिक चौकशी सुरू केली. त्या चौकशीत या मासांची तस्करी पुण्याहून मध्य प्रदेशात केली जात असल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचा: ठाकरे बंधू एकत्र येणार? संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
भारत सरकारने मांगूर प्रजातीच्या मासांवर पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या घातक परिणामांमुळे बंदी घातलेली आहे. असे असूनही काही व्यापारी अधिक नफा कमावण्यासाठी अशा मासांचे अवैधरित्या पालन करत असल्याचे समोर येत आहे. राहाता पोलिसांनी यावर धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर मासे जप्त केले आणि त्यांना योग्यप्रकारे नष्ट केले आहे. हे मासे राहाता येथील डंपिंग ग्राउंडवर खड्डा खणून नष्ट करण्यात आले आहेत.
या कारवाईबाबत माहिती देताना शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांनी सांगितले की मांगूर मासे केवळ पर्यावरणासाठीच नव्हे, तर मानवी आरोग्यासाठीही अत्यंत घातक आहेत. त्यामुळे सरकारने यावर बंदी घातली आहे. मात्र काहीजण पैशाच्या हव्यासापोटी हा व्यवसाय सुरू ठेवतात. पोलिसांनी अशा अवैध व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई केली असून आणखी संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा:जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्यासाठी भडगाव मायंबा ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय