Tanaji Sawant Son Kidnapping Case: मुलगा ऋषिराज सावंतच्या अपहरणाबाबत माजी मंत्री तानाजी सावंत यांचा खुलासा
राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचे अपहरण झाल्याचे वृत्त धडकलं आणि एकच खळबळ उडाली. पण आता ऋषिराज याचे अपहरण झालेच नसल्याचं समोर आलं आहे. खुद्द माजी मंत्री तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली आहे. ऋषिराज सावंत हा बेपत्ता नाही. तो मित्रासोबत आहे. पण तो नेमकं कुठे आहे याची माहिती नसल्याचं सावंत यांनी सांगितलं.
तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसारित झाल्या. यानंतर पोलिसांनी ऋषिराज यांना शोधण्यासाठी मोहिम सुरू केली. यादरम्यान, तानाजी सावंत हे पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल झाले. त्यांनी आधी पोलिसांशी चर्चा केली. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असल्याचं वाटत होतं. पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर सांवत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा ऋषिराज सावंत याचे अपहरण झाले नसून तो मित्रासोबत बाहेर गेल्याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा - उद्यापासून बारावीची परीक्षा; पाहा काय आहे नियोजन
तानाजी सावंतांनी काय माहिती दिली?
पत्रकारांशी बोलताना तानाजी सांवत म्हणाले की, “ऋषिराज सावंत बेपत्ता झालेला नाही. तो त्याच्या मित्रासोबत बाहेर गेला आहे. पण नेमकं कुठे गेला आहे, याची माहिती अद्याप नाही. नेहमी तो कुठेही जाणार असेल तर सांगतो. पण त्याने यावेळी काही कळवलं नाही. इतकचं काय तर तो त्यांच्या गाडीनं देखील गेला नाही. तो दुसऱ्या गाडीतून गेला. त्यामुळे मी काळजी करू लागलो. ऋषिराज अचानकपणे एअरपोर्टवर कसा गेला याची विचारणा करण्यासाठी मी सीपी साहेबांना फोन केला. पण आता मला कळलं तो, चार्टरने बाहेर गेला आहे. याची माहिती त्याच्या ड्रायव्हरने दिली. आम्ही ऋषिराजबद्दल माहिती घेत आहोत.”
हेही वाचा - Pankaja Munde : मी बीडची नागीण, गोपीनाथ मुंडेंची वाघीण; पंकजा मुंडे गरजल्या
दरम्यान, ऋषिराज सावंत यांचं पुणे विमानतळ परिसरातून अपहरण झाल्याचा निनावी फोन पुणे पोलिसांना आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात ऋषिकेश सावंत यांचा स्विफ्ट गाडीतून ४ जणांनी अपहरण केल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कात्रजमधील निवासस्थानी जाऊन तपास सुरू केला होता. पण आता तानाजी सावंत यांनी दिलेल्या माहितीनंतर ऋषिराज यांचं अपहरण झालं नसल्याचं स्पष्ट झालंयं.