मुंबई: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने वाद निर्माण केला आहे. कोल्हापुरात एका आंदोलनादरम्यान भिडे यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात चर्चांना नवीन वळण लागले आहे. देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा नसून भगवा असायला हवा, असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.भिडे म्हणाले, 'आपल्या देशात सध्या जो महायज्ञ सुरू आहे, तो संपता कामा नये. हा महायज्ञ तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा देशाच्या सर्वोच्च स्थानी भगवा झेंडा फडकवला जाईल.' त्यांच्या या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
इतिहासाचा संदर्भ देताना भिडे म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभारणीसाठी अतुलनीय योगदान दिलं. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत मराठा सरदारांनी महाराष्ट्राबाहेरही विजयश्री खेचून आणली आणि कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भगव्याचा झेंडा फडकवला. दिल्लीच्या मुघल तख्तावर भगवा झेंडा फडकवून मराठ्यांनी हिंदुस्थानात 19 वर्षे राजवट गाजवली होती.'
हेही वाचा: धोकादायक स्वदेशी मार्केटच्या पुनर्विकासासाठी मराठी-गुजराती एकत्र; हट्टी व्यापाऱ्यांविरोधात आंदोलन
भिडे यांनी या आंदोलनाला ऐतिहासिक संघर्षाची पुनरावृत्ती असल्याचं म्हटलं. 'आजच्या या उपोषणाची सांगता तेव्हाच होईल जेव्हा लाल किल्ल्यावर भगवा झेंडा पुन्हा फडकवला जाईल,' असं ते म्हणाले. भिडे यांचा दावा आहे की, छत्रपतींच्या कार्याची प्रेरणा कधीही क्षीण होणार नाही. त्यांनी सांगितलं की, 'आता स्वातंत्र्य मिळालं असलं तरी आपल्या संस्कृतीचं आणि परंपरेचं खऱ्या अर्थाने रक्षण व्हायला हवं. भगवा झेंडा हा आपल्या राष्ट्राच्या ओळखीचा भाग असायला हवा.'
काशीचा विश्वेश्वर पुन्हा उभारायचा, पाकिस्तानचा नायनाट करायचा आणि संपूर्ण हिंदुस्थानात भगवा झेंडा फडकवायचा हे या आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे भिडे यांनी जाहीर केलं.
त्यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी भिडेंच्या भूमिकेवर टीका केली आहे, तर काहींनी समर्थन केलं आहे. मात्र, भिडे यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रध्वजाबाबतचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.