महाराष्ट्र: महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. यातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात गाण्यांची मैफिल रंगल्याच पाहायला मिळतंय. कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्याच्या माध्यमातून जोरदार टीका केली. यानंतर सर्वत्र याचे पडसाद उमटू लागले. शिवसेनेने कामराच्या स्टुडिओची तोडफोड करून कामराने केलेल्या कृत्याचा निषेध केला. यानंतर आता काय झाडी.. काय डोंगर.. या वक्तव्याने प्रसिद्ध असणारे शहाजी बापू यांनी नवीन गाण गाऊन कुणाल कमराला उत्तर दिलंय.
हेही वाचा: तुमचाही घिबली स्टाईल फोटो बनत नाहीय का? मग ही बातमी वाचाच
काय म्हणाले शहाजी बापू ?
‘मातोश्री के अंगण मे कामरा आया सुपारी लेके गाना गाया, उद्धवजी को खुशी आया लेकीन ठाणे का टायगर आखो मे अंगार उबाठा को खत्म करणे महाराष्ट्र के मैदान में आया,’ असं गाणं यावेळी शहाजी बापू यांनी म्हटलं आहे. दरम्यान कुणाल कामराच्या या विडंबनात्मक गाण्यामुळे राज्यातील 14 कोटी जनतेचं मन दुखावले आहे, त्यामुळे आपन सांगोला येथे कुणाल कामराच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. यानंतर महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी, असा कायदा पारित व्हावा यासाठी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दरबारी आपले वजन वापरून निधी मिळवून शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं, निवडणूक काळात शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं वचन पूर्ण करावं, आपली फसवणूक झाली अशी भावना शेतकऱ्यांची होऊ नये, अशी मागणीही यावेळी शहाजी बापू यांनी केली आहे.