एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची कारकीर्द महिनाभरात संपेल असा दावा वकील असिम सरोदे यांनी केला आहे. एक्स पोस्ट करत सरोदे यांनी हा दावा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे कायद्याचे हात आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द येत्या महिनाभरात संपवतील. कुणीही, कसेही, मनमानेल त्या पद्धतीने पक्ष फोडतील, पक्ष पळवतील ही असंविधानिकता आणि पक्षचोरी चालणार नाही असे प्रस्थापित होणे कायद्यावर आणि न्यायव्यस्थेवर प्रेम करणारा म्हणून मला महत्वाचे वाटते. असंविधानिक प्रक्रियेतून सरकार प्रस्थापित करण्यात राज्यपाल पदावरील व्यक्तीने सक्रिय सहभागी घेणे, केंद्रीय निवडणूक आयोगाने कायदाबाहय वागणे आणि विधानसभा अध्यक्षांनी कधीच तटस्थ न वागता बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यासाठी काम करणे याबाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार ते सुद्धा मला बघायचे आहे अशा आशयाची पोस्ट वकील असिम सरोदे यांनी केली आहे.