सांगली: गेल्या काही वर्षापासून खंडित झालेली जिवंत नागाच्या पूजेची परवानगी मिळावी अशी मागणी शिराळकर ग्रामस्थांनी केली आहे. हीच मागणी घेऊन जिवंत नागाच्या पूजेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या 32 शिराळा येथील ग्रामस्थ पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. यासाठी केंद्रीय वनमंत्र्यांकडे शिराळा शहरातील सर्व नागराज मंडळांनी रीतसर मागणी केली असून फक्त पूजेकरिता जिवंत नागाची परवानगी मिळावी यासाठी केंद्रीय वनमंत्र्यांकडे अपील करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे इसवी सन पूर्व सातशे वर्षांपूर्वी पासून जिवंत नागाची पूजा नागपंचमी निमित्त केली जाते. शिराळा गावाची ही गेल्या शेकडो वर्षापासूनची परंपरा आहे. शेकडो वर्षापासून या गावात नागपंचमी दिवशी जिवंत नागाची पूजा करतात. जिवंत नागाची पूजा करूनच शिराळकर ग्रामस्थ आपली नागपंचमी साजरी करतात. मात्र अलीकडे वन्यप्राणी कायद्याच्या अंतर्गत करण्यात आलेल्या सुधारित कायद्यानुसार जिवंत नागावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शिराळकर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
हेही वाचा: Weather Update: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 6 जुलैपासून कोकण, पुणे, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा
गेल्या काही वर्षापासून जिवंत नागावर बंदी असल्याने शिराळकर प्रतीकात्मक नागाची नागपंचमी दिवशी पूजा करत आहेत. किमान नागपंचमी दिवशी पूजा करण्याकरिता जिवंत नागाची परवानगी मिळावी यासाठी शिराळकर नागरिकांचा लढा सुरू आहे. सध्या जिवंत नागाच्या पूजेबाबत परवानगी देणारे निवेदन केंद्रीय वनमंत्र्यांच्याकडे प्रलंबित आहे. त्यामुळे वनमंत्र्यांच्या समोर याबाबतची सुनावणी होणार आहे. यासाठी या सुनावणीकडे संपूर्ण शिराळकरांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे केव्हां यंदा तरी जिवंत नागाची पूजा करण्यास परवानगी मिळेल अशी अपेक्षा शिराळकर ग्रामस्थांना आहे.