मुंबई: महाराष्ट्रात महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्यातच आता श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी ही नवीन योजना मुलींसाठी सुरु करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात लवकरच लवकरच 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना' सुरू होणार असल्याची चर्चा आहे. 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी' योजनेचा प्रस्ताव मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने राज्य सरकारला पाठवला आहे.
या योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिल्यास सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टच्यावतीने ही योजना राबवण्यात येणार आहे. राज्यात मुली-महिलांसाठी विविध योजना सुरू आहेत. त्यानंतर आता सिद्धीविनायक मंदिराच्यावतीने गरजू मुलींसाठी आणखी एक योजना सुरू केली आहे. विशेष म्हणजे 8 मार्च म्हणजेच महिला दिनाच्या दिवशी ज्या मुलींचा जन्म झालाय त्यांच्यासाठी श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टची ही अनोखी योजना असणार आहे.
हेही वाचा: ठाण्यात मराठी मुद्द्यावरून मनसैनिक आक्रमक
काय आहे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना?
मुंबईमधल्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने मुलींसाठी एक खास अशी योजना आणली आहे. आठ मार्च रोजी म्हणजे महिला दिनाच्या दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने दहा हजार रुपयांची FD केली जाणार आहे. श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी असं या योजनेचं नाव आहे. राज्य सरकारच्या मान्यतेसाठी ट्रस्टकडून हा प्रस्ताव सादर केला गेलाय.
योजनेचा लाभ काय?
8 मार्चला जन्मलेल्या मुलींच्या नावाने 10 हजार रुपयांची मुदत ठेव केली जाणार आहे. 'लेक वाचवा व लेक शिकवा' मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी ट्रस्टकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.