Wednesday, August 20, 2025 11:42:18 AM

शिंदखेडा उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील खड्ड्यामुळे रुग्णांचे हाल; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिकांचे तीव्र संताप

शिंदखेडा उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर असलेला खड्डा रुग्ण व रुग्णवाहिकांसाठी संकट ठरत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने अपघाताची शक्यता वाढली असून नागरिक प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नाराज आहेत.

शिंदखेडा उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील खड्ड्यामुळे रुग्णांचे हाल प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिकांचे तीव्र संताप

धुळे: जिल्ह्यातील शिंदखेडा शहरातील उपजिल्हा रुग्णालय हे संपूर्ण तालुक्याकरिता आरोग्यसेवेचे प्रमुख केंद्र मानले जाते. मात्र, या रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच पडलेला मोठा खड्डा सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रुग्णवाहिका या खड्ड्यात अडकत असल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ होत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच आरोग्यसेवेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांनाही यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या खड्ड्यामुळे एकीकडे रुग्णालयात येणाऱ्या आणि जात असलेल्या रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण होत आहे, तर दुसरीकडे या खड्ड्यातून पाय सटकून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच एका अपघातग्रस्त रुग्णाला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असताना गाडी खड्ड्यात अडकली आणि त्यामुळे वेळेवर उपचार मिळाले नाहीत. अशा घटनांमुळे रुग्णांचे प्राण धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून हा खड्डा आहे, याची माहिती संबंधित नगरपंचायत प्रशासनाला असूनही अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या असूनही प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे आरोग्य सेवेसारख्या अत्यावश्यक सुविधेवर गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: किडनी ट्रान्सप्लांटसाठी खोळंबलेल्या लाडक्या बहिणीच्या मदतीसाठी धावून आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिंदखेडा हे तालुक्याचे मुख्य शहर असून येथे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात. अशा ठिकाणी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच खड्डा असणे ही बाब निश्चितच गंभीर आणि लाजिरवाणी आहे. यातून प्रशासनाची असंवेदनशीलता आणि सार्वजनिक आरोग्य सेवेकडे असलेले दुर्लक्ष स्पष्ट होते. नागरिक आणि रुग्णांचे नातेवाईक यांनी एकत्र येऊन याबाबत तीव्र आवाज उठवायला सुरुवात केली आहे. 'रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर खड्डा असणे म्हणजे संकटाचे दार उघडे ठेवण्यासारखे आहे,' असे नागरिकांचे म्हणणे आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील यावर आवाज उठवला असून प्रशासनाने तात्काळ हा खड्डा बुजवून रस्ता सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

तत्पूर्वी कुठलीही गंभीर घटना घडण्याआधी नगरपंचायतीने याचे गांभीर्य ओळखून तत्काळ कारवाई करावी, अन्यथा जनतेच्या तीव्र संतापाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित असलेल्या सुविधा आणि रस्त्यांची देखभाल ही प्रशासनाची जबाबदारी आहे, ती त्यांनी पार पाडली पाहिजे, असे नागरिक स्पष्टपणे सांगत आहेत.

हेही वाचा: बडतर्फ जवानाने केली पत्नीची निर्घृण हत्या; कोल्हापुरात खून करून आरोपी सोलापूर पोलिसांकडे हजर

रुग्णांचे प्राण वाचवण्याचे काम करणाऱ्या रुग्णालयाच्या दारात अडथळे निर्माण होणे ही अतिशय गंभीर बाब आहे. प्रशासनाने यावर वेळीच लक्ष दिले नाही, तर भविष्यात यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांची मागणी रास्त असून, प्रशासनाने तत्काळ हा खड्डा बुजवण्याचे काम हाती घ्यावे, हीच सर्वांची एकमुखी मागणी आहे.


सम्बन्धित सामग्री