Suresh Dhas, Dhananjay Munde
Edited Image
आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांची गुप्तभेट घेतली. गेल्या दोन महिन्यांपासून सुरेश धस हे संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत आहेत. तसेच त्यांनी प्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप केला होता. त्यानंतर अनेक वेळा सुरेश धस यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु, आता स्वत: सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या एका खाजगी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यामुळे नेमकी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात समेट घडून आलं असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
धनंजय मुंडे यांच्या भेटीवर सुरेश धस यांची प्रतिक्रिया -
दरम्यान, सुरेश धस यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, धनंजय मुंडे यांची शस्त्रक्रिया झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मी त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो होतो. मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तेथे गेलो होतो. त्यांच्याविरोधातील लढा आणि भेट या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
हेही वाचा - अश्विनी देशमुखांना नोकरीचा प्रस्ताव
अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया -
तथापी, या भेटीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे सर्व आश्चर्यकारक असल्याचं म्हटलं आहे. माझ्या माहितीनुसार भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणली आहे. पण ही अतिशय गंभीर बाब असल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आक्रमक भूमिका घेत अनेक आरोप केले होते. तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन या कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असं धस यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर नागपूरचे हिवाळी अधिवेशन देखील संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी सुरेश धस यांनी लावून धरली होती.
हेही वाचा - ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश
आमदार सुरेश धस यांनी तब्बल दोन महिने धनंजय मुंडे यांच्याविरोधात टीकेचे झोड उठवली होती. अनेक आरोपांच्या मालिका त्यांच्याकडून सुरू होत्या. परंतु, अशावेळी सुरेश धस अचानक त्यांच्या भेटीसाठी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यासोबत सुमारे चार तास भेट झाली. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट ही पारिवारिक भेट होती. त्यांच्यातील मतभेद आहेत मनभेद नाही आहेत, असेही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.