पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरातील प्राधिकरण चौकात असलेल्या प्रसिद्ध 'स्वीट जंक्शन' या मिठाई विक्री करणाऱ्या दुकानात मोठा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या मिठाईत किडे व जंतू आढळल्याचा प्रकार समोर आला असून, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
ग्राहकाने खरेदी केलेल्या मिठाईमध्ये किडे हलताना आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून, या प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.
हेही वाचा: US India Trade: अमेरिकेसोबतचा व्यापार करार शेतकऱ्यांच्या पोटावर पाय?
या प्रकारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. स्थानिक ग्राहक संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेषतः, 'स्वीट जंक्शन'चा परवाना रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.यापूर्वी पुण्यातील प्रसिद्ध 'गुडलक कॅफे'मध्ये अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर एफडीएने तात्काळ कारवाई केली होती. त्याच धर्तीवर 'स्वीट जंक्शन'विरोधातही तात्काळ कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिक आणि ग्राहक संघटनांकडून केली जात आहे.
हेही वाचा:'मुंबईत ये दुबे… समंदरात डुबे-डुबे कर मारू'; भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या विधानावर राज ठाकरेंचा स्फोटक प्रत्युत्तर
मिठाईसारख्या पदार्थामध्ये अशा प्रकारचे जंतू आढळणे म्हणजे आरोग्यासाठी मोठा धोका आहे. अशा प्रकारची बेजबाबदार वागणूक ग्राहकांच्या जीवाशी खेळणारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सध्या हा प्रकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, लोक एफडीएच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत. अन्न सुरक्षा कायद्यांचे पालन न करणाऱ्या दुकानांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा असे प्रकार पुन्हा घडतील, असे स्थानिक नागरिक म्हणत आहेत.
अशा प्रकारांमुळे ग्राहकांचा विश्वास डळमळीत होतो आणि शहरातील खाद्य व्यवसायांची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने वेळेत लक्ष घालून ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात येत आहे.