नागपूर : औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपूरात हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच नागपूरतील एक संतापजनक घटना समोर येत आहे. नागपुरातील हिंसाचारवेळी नराधमांनी अश्लील कृत्य केले आहे. अंधाराचा फायदा घेत महिला पोलिसाचा विनयभंग केला आहे. जमावाविरोधात गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंसाचार करणाऱ्या जमावाने अंधाराचा फायदा घेत एका महिला पोलिसाचा विनयभंग केल्याची खळबळजनक माहिती आहे. चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिंसा सुरू असताना बंदोबस्तात असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. दरम्यान महिला कर्मचाऱ्यांनी स्वतःची सुटका केल्याने मोठा अनर्थ ठळला. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी याबद्दल रितसर तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दिली. त्यानंतर लाजिरवाणी कृत्य करणाऱ्या जमावाविरोधात गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हेही वाचा : हिंसाचारानंतर नागपुरात तणावपूर्ण शांतता
नेमकं घडलं काय?
छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या हटवण्याच्या मागणीमुळे राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दल यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर नागपुरात देखील या संघटनांनी आंदोलन केलं. या आंदोलनामुळे दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यवसान हिंसाचारात झालं.मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ एक मोठा गट जमला होता. या गटाने जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. त्याचवेळी विरोधी गटानेही प्रत्युत्तर म्हणून घोषणाबाजी केली. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांना वेगवेगळं केलं आणि जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र कालांतराने हा जमाव अधिक आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवरच दगडफेक सुरू केली. तसेच एका पोलिस उपाध्यक्षकांवरही कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. यामुळे राज्यात वातावरण पेटले आहेत. यानंतर आता नागपुरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. त्यातच आता हिंसाचारावेळी पोलिस बंदोबस्त करणाऱ्या महिला पोलीस कर्मचारीवर विनयभंग केल्याचा प्रकार उघड झाला आहे. जमावाविरोधात गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.