मुंबई: शिक्षकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नवीन वर्षाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहताय परंतु आता नवीन वर्षात शिक्षकांचा पगार उशिराने होणार असल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे शिक्षकांचा पगार उशिरा होण्याचं कारण हे लाडकी बहीण योजना असल्याचं बोललं जातंय.
याबाबत सविस्तर:
नव्या वर्षात शिक्षकांना पगारासाठी वाट पाहावी लागू शकते. यासंदर्भातील एक कारण लाडकी बहीण योजनेनं सरकारवर आलेला आर्थिक भार असल्याचं बोललं जातंय. 1 ते 5 तारखेदरम्यान राज्यातील शिक्षकांचे पगार होत असतात. यामध्ये प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि निमसरकारी शाळा, सरकारी शाळांच्या शिक्षकांचे पगार त्या कालावधीत होत असतात. पण, त्यासाठी जी सगळी कागदपत्र असतात त्याची पूर्तता 15 तारखेपर्यंत होणं आवश्यक असतं.
त्यानंतर रक्कम मिळत असते. योजनांवरील खर्चांच्या तरतुदी करण्यात येत असल्यानं शिक्षकांच्या पगारासंदर्भातील तरतूद काल करण्यात आल्याची माहिती आहे. म्हणूनच शिक्षकांचा पगार जो 1 ते 5 तारखेपर्यंत होत असतो तो उशिरानं होऊ शकतो. म्हणजेच नववर्षात 2 ते 3 दिवस उशिरानं शिक्षकांचा पगार होऊ शकतो. नेहमी 15 तारखेपर्यंत शिक्षकांच्या पगाराची रक्कम वर्ग करण्यात येते. डिसेंबरचा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता द्यायचा असल्याने यासाठी उशीर झाल्याची माहिती आहे. लवकरात लवकर पगार करण्यासाठी आता शिक्षण विभागाची धावपळ सुरू आहे.