Accident प्रतिकात्मक प्रतिमा
Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी दुपारी भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात 32 वर्षीय महिला डॉक्टरचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. हा अपघात रायगड जिल्ह्यातील लोनेरे आणि महाड दरम्यान टेम्पले गावाजवळ घडला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मृत महिलेची ओळख डॉ. प्रियंका अहिर अशी झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, एक भरधाव कंटेनर ट्रक मुंबईच्या दिशेने जात होता. त्याच दिशेने मागून येणाऱ्या वॅगनआर कारने अचानक ट्रकला जोरदार धडक दिली. ही टक्कर एवढी भीषण होती की कार ट्रकच्या मागील चाकाखाली अडकली आणि पूर्णपणे चिरडली गेली.
या अपघातात डॉ. प्रियंका अहिर यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील दुसऱ्या प्रवाशाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. पोलिस आणि महामार्ग सुरक्षा पथकानेही वेगाने घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढले. गंभीरपणे नुकसान झालेली कार रस्त्याच्या मध्यभागी अडकल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. क्रेनच्या मदतीने वाहन बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
हेही वाचा - Mumbai Best Bus Accident : इलेक्ट्रिक बस कारवर आदळली, मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा चिरडून मृत्यू
दरम्यान, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की अपघाताचे मुख्य कारण अतिवेग आणि ट्रकपासून सुरक्षित अंतर न राखणे हे असावे. पोलिसांनी कंटेनर ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी पुढील सविस्तर चौकशी सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वैद्यकीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला. मुंबई-गोवा महामार्गावर सतत वाढणारे अपघात हा स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांसाठी गंभीर चिंता विषय झाला आहे. विशेषतः लोनेरे आणि महाड परिसरात जड वाहनांचा वेग, रात्रीच्या वेळी होणारी बेदरकार ड्रायव्हिंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या मार्गावर वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हेही वाचा - Flight Accident : भीषण अपघात : दोन विमानाची समोरासमोर टक्कर ; जखमींवर उपचार सुरु
या घटनेने पुन्हा एकदा महामार्गावर वाहन चालवताना वेग मर्यादा पाळण्याचे, सुरक्षित अंतर ठेवण्याचे आणि सतर्क राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. प्रशासनाने प्रवाशांना अपघात टाळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.